इमारत धोकादायक इमारतींच्या यादीतून वगळण्यासाठी पाच हजार रुपयांची लाच मागणाऱ्या ठाणे महापालिकेच्या मुंब्रा प्रभाग समिती कार्यालयातील अनुरेखक (ट्रेसर) रामकृष्ण किसन पाटील या कर्मचाऱ्यास शुक्रवारी लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या पथकाने मुद्देमालासह अटक केली.  
ठाण्यातील वागळे इस्टेट, कळवा, मुंब्रा परिसरात धोकादायक इमारतींची संख्या बरीच मोठी आहे. सतत होणाऱ्या दुर्घटनांमुळे ठाणे महापालिकेने अशा इमारतींचे सर्वेक्षण सुरु ठेवले आहे. अतिधोकादायक असलेल्या इमारतींमधील रहिवाशांना तातडीने घरे रिकामी करण्याचे आदेश देण्यात येतात. त्यामुळे धोकादायक इमारतींच्या यादीत अशा इमारतींचा समावेश होऊ नये, यासाठी या भागातील काही जमीन मालक प्रयत्नशील असल्याची चर्चा सुरु आहे. मुंब्रा परिसरातील एक वडिलोपार्जीत इमारत धोकादायक इमारतीच्या यादीतून वगळावी यासाठी महापालिकेच्या अनुरेखकाकडून लाच मागितल्याचा प्रकार उघडकीस आली. मुंब्रा येथील धोकादायक इमारतींच्या यादीतून नाव वगळण्यासाठी रामकृष्णने पाच हजारांची लाच मागितली होती.