ठाणे शहरातील कार्बन उत्सर्जनाचे प्रमाण कमी करण्यासंबंधीचे विविध पर्यावरणाभिमुख प्रकल्प येत्या तीन वर्षांत राबविण्यात येणार असून हे प्रकल्प युएन हॅबिटॅट, युरोपियन कमिशन यांच्यावतीने तसेच इक्ले साऊथ एशिया या संस्थेच्या माध्यमातून राबविण्यात येणार आहेत. या प्रकल्पासाठी युएन हॅबिटॅट, युरोपियन कमिशनने ठाणे महापालिकेला एक लक्ष युरोचे अनुदान देण्याचा निर्णय यापुर्वीच घेतला होता. दरम्यान, या संबंधीच्या सामजंस्य करारावर शुक्रवारी दोन्ही संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी स्वाक्षऱ्या केल्याने आता या प्रकल्पांचा मार्ग मोकळा झाला आहे.
ठाणे महापालिकेच्या नागरी संशोधन केंद्रात पार पडलेल्या एका कार्यक्रमामध्ये महापालिकेच्यावतीने महापौर हरिश्चंद्र पाटील, आयुक्त आर. ए. राजीव आणि इक्लेच्यावतीने इक्ले साऊथ एशिया या संस्थेचे कार्यकारी संचालक इमानी कुमार यांनी या सामजंस्य करारवर स्वाक्षऱ्या केल्या. यावेळी उपमहापौर मिलींद पाटणकर, विद्युत विभागाचे उपनगर अभियंता सुनील पोटे आणि इतर अधिकारी उपस्थित होते. युएन हॅबिटॅट आणि युरोपियन कमिशन यांच्यावतीने ब्राझील, दक्षिण आफ्रिका, इंडोनेशिया आणि भारत या चार देशांमध्ये पर्यावरणाभिमुख नागरी विकासाच्या धोरणांना प्रोत्साहन देण्यासाठी तसेच कार्बन उत्सर्जनाचे प्रमाण कमी करण्यासाठी विविध पर्यावरणाभिमुख प्रकल्प राबविण्यात येणार आहेत. या प्रकल्पासाठी भारतामधून पहिल्या क्रमांकाचे शहर म्हणून ठाणे शहराची निवड करण्यात आली असून त्यासाठी महापालिकेला एक लक्ष युरोचे अनुदान देण्याचा निर्णय युएन हॅबिटॅट आणि युरोपियन कमिशनने यापुर्वीच घेतला आहे. त्याच पाश्र्वभूमीवर दोन्ही संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी सामजंस्य करारवर स्वाक्षऱ्या केल्या आहेत. या करारामुळे पर्यावरणाभिमुख काम करणाऱ्या जगातील निवडक आठ शहरांमध्ये ठाणे शहराचा समावेश झाला असून येत्या तीन वर्षांत शहरामध्ये कार्बन उत्सर्जन कमी करण्यासंबंधी विविध पर्यावरणाभिमुख प्रकल्प राबविण्यात येणार आहेत. या संबंधीचे प्रकल्प राबविण्यासाठी महापालिका आणि नागरिक, अशा दोन समित्या तयार करण्यात येणार असून यामध्ये सामाजिक संस्था, लोकप्रतिनिधी, आदींनाही सहभागी करून घेण्यात येणार आहे. तसेच या प्रकल्पासाठी विविध तज्ज्ञांकडून सविस्तर अ‍ॅक्शन प्लॅन तयार करून त्याची अंमलबजावणी करण्यात येणार आहे, अशी माहिती इमानी कुमार यांनी दिली.