ठाणे येथील रामचंद्रनगर परिसरातील खचलेली ‘सुर्यदर्शन’ ही चार मजली अनधिकृत इमारत जमीनदोस्त करण्याचे काम शनिवारी दुपारी महापालिकेने हाती घेतले असून त्यासाठी परिसरात मोठय़ा प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. मद्रास येथून आणण्यात आलेल्या अद्ययावत क्रेनच्या साहाय्याने ही कारवाई करण्यात येत आहे. तसेच इमारत पुर्णपणे भुईसपाट करण्यासाठी आणखी तीन ते चार दिवस लागण्याची शक्यता महापालिका सुत्रांकडून वर्तविण्यात येत आहे.
‘सुर्यदर्शन’ ही इमारत धोकादायक असल्याचा अहवाल बांधकाम तज्ज्ञांनी महापालिकेला दिला होता. त्यानुसार, महापालिकेने ही इमारत जमीनदोस्त करण्याचा निर्णय घेतला होता. तसेच जमीनदोस्तची कारवाई करताना आसपासच्या इमारतींना धोका पोहचू नये, यासाठी महापालिकेने दिल्लीच्या विशेष पथकाची मदत घेतली. या पथकाने इमारत परिसराची पाहाणी करून इमारत कशापद्धतीने पाडावी, याविषयी महापालिकेस आराखडा तयार करून दिला होता. त्यानुसार, शुक्रवारपासून सुर्यदर्शन इमारत जमीनदोस्त करण्याचे काम सुरू होणार होते. पण, या कारवाईसाठी मद्रास येथून मागविण्यात आलेला अद्ययावत क्रेन ठाण्यात दाखल झाला नव्हता. दरम्यान, शनिवारी सकाळी क्रेन ठाण्यात येताच महापलिकेने दुपारपासून ‘सुर्यदर्शन’ इमारत पाडण्याचे काम हाती घेतले. इमारत पुर्णपणे भुईसपाट करण्यासाठी आणखी तीन ते चार दिवस लागणार आहे. या कारवाईसाठी सुमारे २५ लाख रुपये खर्च येणार असून त्यापैकी सुमारे १५ लाख रुपये खर्च क्रेनकरीता करण्यात खर्च करण्यात आले आहेत. विशेष म्हणजे, मद्रास येथून आणलेला क्रेन ३६० डिग्रीमध्ये (चौहबाजूनी) वळू शकतो. सुमारे ३० मीटर उंचीपर्यंत त्याचे कटर पोहचू शकते. तसेच अशा प्रकारचे सुमारे चार क्रेन भारतात उपलब्ध आहेत, अशी माहीती महापालिका सुत्रांनी दिली.