धार्मिक उत्सवानिमित्ताने रस्ता अडवून विनापरवाना उभारण्यात येणारे मंडप हटवण्याची कारवाई महापालिकेमार्फत करण्यात येणार असून अशा मंडपांची पहाणी करण्यासाठी जिल्ह्यातील प्रत्येक महापालिका क्षेत्रात तहसीलदारांची नेमणूक करण्यात आली आहे. तसेच ध्वनी प्रदूषण पंचनामा अहवालात प्रथमदर्शनी दोषी आढळणाऱ्या मंडळांविरोधात ठाणे पोलिसांकडून तात्काळ न्यायालयात तक्रारी दाखल करण्यात येणार आहेत. यापूर्वी मंडळांना सात दिवसांची नोटीस पाठवून त्यांची बाजू मांडण्याची संधी दिली जात होती. मात्र, ही पद्धत पोलिसांनी गुंडाळली असून थेट तक्रारी दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे. याशिवाय, नव्या मंडळांना उत्सवासाठी मंडप उभारण्याची परवानगी न देण्याचाही निर्णयही ठाणे पोलिसांनी घेतला आहे.
ठाणे, कल्याण-डोंबिवली, भिवंडी, उल्हासनगर, अंबरनाथ आणि बदलापूर आदी जिल्ह्यांतील महत्त्वाच्या शहरांमध्ये धार्मिक उत्सव मोठय़ा उत्साहाने साजरे होत असतात. मात्र, हे उत्सव साजरे करताना अनेक मंडळांकडून नियमांचे उल्लंघन करण्यात येत असल्याचे चित्र आहे. त्या पाश्र्वभूमीवर उच्च न्यायालयात दाखल झालेल्या याचिकेवर सुनावणी देताना न्यायालयाने महत्त्वपूर्ण सूचना केल्या आहेत. त्यानुसार महापालिका प्रशासन आणि पोलीस यंत्रणेने नवे धोरण आखले असून यासंबंधीची माहिती देण्यासाठी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात पत्रकार परिषद घेण्यात आली. धार्मिक उत्सवानिमित्ताने रस्त्यावर उभारण्यात आलेल्या मंडपांसाठी मंडळाने परवानगी घेण्यात आली आहे का तसेच परवानगी घेतली असेल तर ती मंडपाच्या दर्शनी भागावर लावली आहे का, याचा आढावा घेण्यासाठी जिल्ह्यातील प्रत्येक महापालिका क्षेत्रात तहसीलदारांची नेमणूक करण्यात आली आहे. ते उत्सवाच्या सात दिवस आधी पहाणी करून त्यासंबंधीचा अहवाल महापालिका आयुक्तांना सादर करणार आहेत, अशी माहिती अतिरिक्त जिल्हाधिकारी अशोक शिंगारे यांनी दिली.
उत्सवानिमित्ताने रस्त्यावर विनापरवाना मंडप उभारण्यात आल्याचे निदर्शनास आले तर असे मंडप तात्काळ काढून टाकण्यात येणार आहेत. रस्त्यांच्या एकचतुर्थाश भागावर मंडप उभारणीस परवानगी देण्यात येणार आहे तर ८ मीटरपेक्षा कमी रस्त्यावर अशी परवानगी देण्यात येणार नाही. तसेच यासंबंधी तक्रारी करण्यासाठी टोल फ्री क्रमांक सुरू करण्यात आला आहे, अशी माहिती महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुनील चव्हाण यांनी दिली. उत्सवाच्या ठिकाणी आवाजांची पातळी मोजण्यात येईल  व पंचनामे करण्यात येणार आहे. त्यानंतर हा अहवाल त्याच दिवशी सहाय्यक पोलीस आयुक्तांकडे पाठविण्यात येणार आहे. यात प्रथमदर्शनी दोषी मंडळांविरोधात दुसऱ्याच दिवशी न्यायालयात तक्रारी दाखल करण्यात येणार आहेत, अशी माहिती वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस आयुक्त पी. के. मठाधिकारी यांनी दिली.

८५ ठिकाणी तक्रारी नोंदवता येणार
ठाणे, भिवंडी, कल्याण, उल्हासनगर आणि वागळे या पाच परिमंडळाचे पाच पोलीस उपायुक्त, दहा सहाय्यक पोलीस आयुक्त, ३३ वरिष्ठ पोलीस निरीक्षक आणि पोलीस ठाण्यांचे अंमलदार, चार नियंत्रण कक्ष, अशा ८५ ठिकाणी नागरिकांना तक्रारी नोंदविता येऊ शकतात. ध्वनी प्रदूषणांच्या तक्रारीसाठी स्वतंत्र नोंदवही ठेवण्यात येणार असून प्राप्त तक्रारींवर काय कारवाई झाली, याचीही माहिती नोंदविण्यात येणार आहे.