News Flash

ठाणे परिवहन बस घोटाळ्यात तेरा जणांना कारावास

ठाणे पालिका परिवहन सेवेच्या तीस नवीन बसच्या बॉडी बिल्डिंग व निविदा प्रक्रियेत घोटाळा करून ठाणे परिवहन प्रशासनाचे आर्थिक नुकसान व फसवणूक केल्याप्रकरणी परिवहन समितीचे तत्कालीन

| June 2, 2013 02:42 am

ठाणे पालिका परिवहन सेवेच्या तीस नवीन बसच्या बॉडी बिल्डिंग व निविदा प्रक्रियेत घोटाळा करून ठाणे परिवहन प्रशासनाचे आर्थिक नुकसान व फसवणूक केल्याप्रकरणी परिवहन समितीचे तत्कालीन सदस्य, अधिकारी आणि ठेकेदार अशा १३ जणांना ठाणे जिल्हा सत्र न्यायालयाचे न्यायाधीश के. आर. वारियर यांनी शनिवारी तीन वर्षांचा कारावास आणि पंधरा हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली.
शिक्षा झालेल्यांमध्ये शिवसेनेचे ज्येष्ठ नगरसेवक विलास सामंत, मनसेचे नगरसेवक सुधाकर चव्हाण यांचा समावेश आहे. तेरा जणांनी पंधरा हजारांचा दंड भरल्याने त्यांची तात्पुरत्या जामिनावर सुटका करण्यात आली आहे. सन १९९१-९२ मध्ये घडलेल्या या घोटाळ्यात शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी आणि मनसेचे सदस्य असल्याने खळबळ उडाली आहे. सर्व दोषींनी या निर्णयाविरोधात उच्च न्यायालयात दाद मागण्याचा निर्णय घेतला आहे.
ठाणे पालिका परिवहन समितीचे तत्कालीन सभापती शिवसेनेचे विलास सामंत यांच्या कारकीर्दीत तीस बसच्या बॉडी बिल्डिंगसाठी समितीच्या ३० सप्टेंबर १९९१ च्या सभेत ठराव मंजूर करण्यात आला होता. या ठरावाप्रमाणे जुलै १९९२ मध्ये स्पर्धात्मक निविदा मागविण्यात आल्या होत्या. या निविदांना चार कंपन्यांनी प्रतिसाद दिला. त्यामध्ये भारती वर्कशॉप ३ लाख ४६ हजार, त्रिमूर्ती बॉडी बिल्डर ४ लाख ७१ हजार, स्टार लाइन ४ लाख २४ हजार, इनकोच बिल्डर्स ४ लाख ८० हजार यांचा सहभाग होता.
समितीने या ठेकेदारांच्या निविदांचे बाजारभाव मूल्यांकन न करता, कमी दराच्या ठेकेदाराची निवड न करता या कामाचा ठेका त्रिमूर्ती, इनकोच, स्टार लाइन या कंपन्यांना दिला होता. त्यामुळे परिवहन उपक्रमाचे ३२ लाख १८ हजार ६०० रुपयांचे आर्थिक नुकसान झाल्याचा ठपका ठेवण्यात आला होता. ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने या घोटाळ्याप्रकरणी चौकशी करून परिवहन समितीचे तत्कालीन १३ सदस्य व ३ ठेकेदारांवर गुन्हा दाखल केला होता. एसीबीचे प्रफुल्ल जोशी यांनी याप्रकरणात तपास अधिकारी म्हणून काम पाहिले. अ‍ॅड. हेमलता देशमुख यांनी सरकार पक्षाची बाजू मांडली.
यांना शिक्षा झाली..
* परिवहन समितीचे तत्कालीन सभापती विलास सामंत,
* सदस्य मदन मंत्री,
* दीपक देशमुख,
* मनसचे गटनेते सुधाकर चव्हाण,
* काँग्रेसचे डॅनी डिसोझा,
* राष्ट्रवादीचे देवराम भोईर,
* रिपब्लिकन पक्षाचे गंगाराम इंदिसे,
* आगार व्यवस्थापक अरविंद आगाशे,
* निवृत्त उपव्यवस्थापक कमलाकर दीक्षित,
* कार्यशाळा व्यवस्थापक मुकुंद केळकर,
* त्रिमूर्ती कंपनीचे भागीदार सीताराम आंबेकर,
* इनकोचचे भागीदार अशोक धिंगरानी,
* स्टार लाइनचे व्यवस्थापकीय संचालक दिलीप चोप्रा.
या प्रकरणातील आरोपी भाजपचे रामनारायण यादव, रामचंद्र ठाकूर, परिवहन लेखापाल मधुसूदन आपटे यांचे या पूर्वीच मृत्यू झाले आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 2, 2013 2:42 am

Web Title: tmt bus scam 13 people send in jail
टॅग : Tmt Bus
Next Stories
1 कोळीवाडे-गावठाणांना स्वतंत्र नळजोडणी
2 पालिकेची सभ्यतेची व्याख्या ‘अस्पष्ट’!
3 पत्नीला वंध्यत्वावरून हिणवणे ही क्रूरताच!
Just Now!
X