डिझेलच्या दरांत वाढ झाल्यामुळे वर्षांला होणारा सुमारे पाच कोटी रुपयांचा तोटा असह्य झाल्याने ठाणे महापालिका परिवहन उपक्रमाने (टीएमटी) बससेवेच्या तिकीटदरांत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. यासंबंधीचा प्रस्ताव तयार करण्यात येत असून येत्या महिन्याभरात ही दरवाढ लागू होणार आहे.
अनियमीत आणि अपुऱ्या बससेवेबद्दल ठाणेकर नाराज असतानाच व्यवस्थापनाने भाडेवाढीचा निर्णय घेऊन प्रवाशांच्या खिशाला कात्री लावली आहे. परिवहन व्यवस्थापक देवीदास टेकाळे यांनी गुरुवारी परिवहन समितीसमोर मांडलेल्या टीएमटीच्या अर्थसंकल्पात भाडेवाढ अपरिहार्य असल्याचे म्हटले आहे. परिवहन सेवेतील डिझेलवर धावणाऱ्या बसेसना प्रतीदिवशी सरासरी सुमारे ९८५० लिटर इतके डिझेल लागते. गेल्या वर्षभरात डिझेलच्या दरात तब्बल १२ रुपयांची वाढ झाल्याने हा आर्थिक भार ‘टीएमटी’ला असह्य़ होऊ लागला आहे. यामुळे भाडेवाढ करण्यात येणार असून याबाबतचा प्रस्ताव लवकरच परिवहन समितीच्या मान्यतेसाठी सादर करण्यात येईल, असे सांगण्यात आले. येत्या अर्थसंकल्पात डिझेल आणि सीएनजीच्या खरेदीसाठी सुमारे २५ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून प्रवासी भाडय़ात वाढ केल्यास पाच कोटी रुपयांचा तोटा कमी होऊ शकतो, असा दावा व्यवस्थापनाने केला आहे.
विशेष म्हणजे, उपक्रमाच्या ताफ्यातील ७५ बसेस नादुरुस्त झाल्या असून एकूण १०० बसेस आगारात उभ्या असल्याची कबुलीही या अर्थसंकल्पात देण्यात आली आहे. ताफ्यातील ३१३ बसेसपैकी जेमतेम २१० बसेस आगारबाहेर काढणे टीएमटीला जमले आहे.  

ठाण्यात बेस्ट, एनएमएमटी धावणारच
ठाणे शहरात बेस्ट, नवी मुंबई , मिरा-भाईंदर तसेच वसई विरार महापालिका परिवहन उपक्रमाच्या बसेस धावतात. मुंबई महानगर प्राधिकरण क्षेत्रात कोणत्याही स्थानिक स्वराज्य संस्थेच्या बसेसना एकमेकांच्या हद्दीत प्रवासी सेवा पुरविण्याचे अधिकार प्रदान करण्यात आले आहेत. त्यानुसार इतर प्राधिकरणांच्या प्रवासी सेवांना आमची कोणतीही हरकत नाही,  ठाणे महापालिकेचे नगर अभियंता के.डी.लाला यांनी गुरुवारी स्पष्ट केले. यासंबंधीचे चुकीचे वृत्त गुरुवारी काही वर्तमानपत्रांमध्ये प्रसिद्ध झाले होते. दरम्यान, ठाण्यातील आनंदनगरपासून ओवळा, गायमुखपर्यत पुर्व द्रुतगती महामार्ग आणि घोडबंदर मार्गावर ‘टीएमटी’ बसेससाठी स्वतंत्र्य मार्गीका तयार करण्याचे काम सुरू करण्यात येणार आहे, असेही ते म्हणाले.