पत्नीला व्यवस्थित जेवण बनवायला सांगणे किंवा तिला घरकाम सांगणे याचा अर्थ तिला वाईट वागणूक दिली असा होत नाही. आत्महत्येच्या एका प्रकरणाच्या सुनावणीत मुंबई उच्च न्यायालयाने हे मत नोंदवले आहे. सांगलीतील १७ वर्षापूर्वीच्या सूनेच्या आत्महत्येच्या प्रकरणात उच्च न्यायालयाने नवऱ्याची आणि त्याच्या आई-वडिलांची निर्दोष मुक्तता करण्याचा सत्र न्यायालयाचा निर्णय कायम ठेवला.

सूनेला वाईट वागणूक दिल्यामुळे तिने विष पिऊन आत्महत्येचे टोकाचे पाऊल उचलले असा फिर्यादी पक्षाचा दावा होता. मृत महिलेला जेवण व्यवस्थित बनवायला सांगणे किंवा तिला घरकाम करायला सांगणे याचा अर्थ तिला वाईट वागणूक दिली असा होत नाही. सूनेला त्रास दिल्याचा किंवा तिला आत्महत्येचा प्रवृत्त केल्याचा कोणताही पुरावा नाहीय असे न्यायमूर्ती सारंग कोटवाल यांनी सांगितले.

नवऱ्याचे दुसऱ्या महिलेबरोबर अनैतिक संबंध असल्याचा मृत पत्नीचा आरोप होता. पण फिर्यादी पक्षाला हा आरोप सिद्ध होऊ शकेल असा कोणताही पुरावा सादर करता आला नाही. त्यामुळे आरोपींना आत्महत्येला प्रवृत्त केल्या प्रकरणी जबाबदार धरता येणार नाही असे उच्च न्यायालयाने आपल्या निकालात म्हटले आहे.

आरोपी विजय शिंदे आणि महिलेचा १९९८ साली विवाह झाला होता. ५ जून २००१ रोजी पत्नीने आत्महत्या केली. या महिलेला जेवण बनवणे आणि घरकाम करण्यावरुन नवरा आणि सासू-सासऱ्यांकडून बोलणी ऐकावी लागायची. या महिलेने आत्महत्येचे पाऊल उचलण्यापूर्वी तिचे आजोबा आणि काका तिच्या घरी गेले होते त्यावेळी दोघा नवरा-बायकोंमध्ये जोरदार भांडण सुरु होते. त्यावेळी घरातल्या ज्येष्ठ मंडळींनी दोघांमधला वाद सोडवला त्यानंतर काही वेळाने त्यांना महिलेने आत्महत्या केल्याची बातमी समजली. महिलेचा मृत्यू झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी तक्रार नोंदवण्यात आली. त्यावेळी साक्षीदारांनी घरामध्ये वाद असल्याची कोणतीही माहिती दिली नव्हती हा मुद्दा न्यायालयने निदर्शनास आणून दिला.