“राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्याबरोबर सरकार स्थापन करण्याचा निर्णय विचारपूर्वक घेण्यात आला होता. हा हवेत घेतलेला निर्णय नव्हता” असे राज्याचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी स्पष्ट केले. ‘साठीचा गझल.. महाराष्ट्राचा’ या ‘लोकसत्ता’तर्फे आयोजित वेबिनारमध्ये ते बोलत होते.

“सगळयांनी मिळून आम्हाला वाळीत टाकायचं ठरवलं आहे. बहुमताच उपयोग होणार नाही हे जेव्हा आमच्या लक्षात आलं, तेव्हा खेळात टिकून राहणं आवश्यक असतं. म्हणून अजित पवारांबरोबर सरकार स्थापन करण्याचा निर्णय घेतला” असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.

“अजित पवारांनी स्वत: सरकार स्थापन करण्याची तयारी दाखवली होती. त्यांनी आमदारांशी आमची चर्चा देखील घडवून आणली होती. त्यामुळे हा हवेत घेतलेला निर्णय नव्हता” असे फडणवीस यांनी सांगितले.

महाराष्ट्रात शिवसेना-भाजपाने युती म्हणून विधानसभेची निवडणूक एकत्र लढवली पण विधानसभा निवडणुका झाल्यानंतर सत्ता स्थापनेसाठी भाजपाला शिवसेनेकडून प्रतिसाद मिळत नव्हता. शिवसेनेने वेगळी चूल मांडण्याचे संकेत दिले. काँग्रेस-राष्ट्रवादी आणि शिवसेनेची सरकार स्थापनेसाठी बोलणी सुरु होती. दररोज चर्चेच्या फेऱ्या सुरु होत्या. त्या दरम्यान अचानक एकदिवस सकाळी अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांनी राजभवनात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. सर्वांसाठीच तो एक मोठा राजकीय धक्का होता. पण अजित पवार यांच ते बंड फसलं. राष्ट्रवादीचे आमदार शरद पवारांसोबत राहिले आणि ४८ तासांच्या आत ते सरकार कोसळलं.