शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा बायोपिक असणारा ‘ठाकरे’ चित्रपट करमुक्त करण्यात यावा अशी मागमी भाजपाच्या चित्रपट आघाडीने राज्याच्या सांस्कृतिक मंत्रालयाकडे केली आहे. या खात्याचे मंत्री असलेल्या विनोद तावडे यांना भाजपाच्या चित्रपट आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी याबाबतचे पत्र दिले आहे. त्यानंतर ‘ठाकरे’ चित्रपट करमुक्त करण्याबाबत सकारात्मक विचार करण्यात येईल असे आश्वासन तावडेंनी दिले आहे.

‘ठाकरे’ चित्रपट करमुक्त करण्यात यावा ही मागणी राजकीय हेतूने प्रेरित असल्याचे मानण्यात येत आहे. कारण, शिवसेना-भाजपात युती होण्याची चिन्हे दिसत नाहीत. युतीवरुन दोन्ही पक्षांकडून एकमेकांविरोधात दंड थोपटले जात आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेनेला गोंजारण्यासाठीच भाजपा कार्यकर्त्यांनी भाजपाचे मंत्री तावडे यांच्याकडे ही मागणी केल्याची चर्चा आहे. कारण, शिवसेना नेते संजय राऊत हे ठाकरे चित्रपटाचे निर्माते आहेत. कायमच भाजपावर तोंडसुख घेणाऱ्या राऊतांना गळ घालण्याासाठी भाजपाची ही खेळी असल्याचे बोलले जात आहे.

येत्या २५ जानेवारीला ‘ठाकरे’ चित्रपट प्रदर्शित होत आहे. यामध्ये बॉलिवूड अभिनेता नवाजुद्दीन सिद्दिकी याने बाळासाहेब ठाकरेंची प्रमुख भुमिका साकारली आहे. तर बॉलिवूड अभिनेत्री अमृता राव हीने यात माँसाहेब अर्थात बाळासाहेबांच्या पत्नी मीनाताई ठाकरे यांची भुमिका साकारली आहे. त्याचबरोबर सचिन खेडेकर यांनी यातील बाळासाहेब ठाकरेंच्या व्यक्तीरेखेला आवाज दिला आहे. हिंदी आणि मराठी अशा दोन्ही भाषांमध्ये हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.