शिवसेनेच्या किमान एका सदस्याला राम मंदिर ट्रस्टच्या विश्वस्त मंडळात घ्या, अशी मागणी शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली आहे. यासाठी त्यांनी मोदींना एक पत्र लिहिले असून त्याद्वारे राम मंदिराच्या चळवळीत शिवसेनेचेही योगदान असल्याचे म्हटले आहे.

पंतप्रधानांना लिहिलेल्या पत्रात सरनाईक म्हणतात, “शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी राम मंदिराच्या उभारणीसाठीच्या चळवळीत बहुमुल्य योगदान दिले आहे. त्यांच्या या योगदानाची दखल घेऊन किमान एका शिवसैनिकाला तरी राम मंदिर ट्रस्टच्या विश्वस्त मंडळात घ्यावे.”

दरम्यान, उद्या (शनिवार) उद्धव ठाकरे रामलल्लाच्या दर्शनासाठी अयोध्येला जाणार आहेत. या दौऱ्यात ते प्रथम लखनौला जातील त्यानंतर अयोध्येकडे रवाना होतील. येथे शरयू नदीच्या तिरावर आरतीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. मात्र, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याशी चर्चा झाल्यानंतर हा कार्यक्रम स्थगित करण्यात आला आहे. करोनाचा प्रादुर्भाव वाढतोय या पार्श्वभूमीवर जास्त गर्दीचे कार्यक्रम टाळण्याच्या सूचना मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केली होती, असे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी सांगितले.

“सरकार सरकारच्या जागी आणि आस्था आस्थेच्या जागी आहे. काँग्रेसच्या लोकांनही या ठिकाणी यावं. ज्या लोकांना आस्था आहे त्या पक्षाच्या लोकांनीही या ठिकाणी यावं असं आम्हाला वाटतं. मंदिर निर्मितीचं कार्य हे राष्ट्रीय कार्य आहे. यासाठी अनेक कारसेवक, साधू संतांनी बलिदान दिलं आहे. न्यायालयानं आता निर्णय दिला आहे. सर्व पक्षांच्या लोकांनी या ठिकाणी येऊन दर्शन घ्यावं, असं आम्हाला वाटतं,” असं राऊत यावेळी म्हणाले.