जागतिक तंबाखूविरोधी दिनानिमित्ताने मंत्रालयात विविध कार्यक्रम
मंत्रालयाच्या परिसरामध्ये आता तंबाखूजन्य पदार्थाचे सेवन आणि धूम्रपान करण्यास बंदी असणार आहे. जागतिक तंबाखूविरोधी दिनाच्या निमित्ताने मंत्रालय तंबाखूमुक्त करण्यासाठी राज्य सरकार आणि सलाम फाऊंडेशनच्यावतीने गुरुवारी मंत्रालयामध्ये कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
सलाम फाऊंडेशनच्या मदतीने गुरुवारपासून तीन दिवस विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
गुरुवारी या कार्यक्रमाची सुरुवात झाली असून या वेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी राज्यातील सर्व प्रशासकीय मुख्यालये तंबाखूमुक्त करण्याची शपथ घेतली. संस्थेच्या वतीने मंत्रालय परिसरामध्ये प्रदर्शन भरविण्यात आले असून यामध्ये तंबाखूचे दुष्परिणाम दाखविणारे फलक, पुस्तके मांडण्यात आले. तसेच संवादात्मक खेळही आयोजित करण्यात आले आहेत. या वेळी सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बदोले यांनी तंबाखूमुक्त शाळेचे मॉडेल सादर करत माहिती दिली.
सिगारेट आणि अन्य तंबाखूजन्य उत्पादने कायद्यांतर्गत (सीओटीपीए) उल्लंघन केल्याचे निदर्शनास आल्यास १८००२२२३६५ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा, असे अन्न व औषध प्रशासनाकडून या वेळी करण्यात आले. तंबाखूजन्य पदार्थासोबत खाद्यपदार्थाची विक्री आणि शाळा परिसराच्या १०० यार्ड अंतरावर तंबाखूजन्य पदार्थाची विक्री आढळून आल्यास या क्रमांकावर माहिती द्यावी.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on June 2, 2018 12:48 am