मुंबई : करोना उपचारात दिले जाणारे ‘टोसीलीझुमाब’ औषध पुरेशा प्रमाणात उपलब्ध होत नसल्याने ते मिळवण्यासाठी संपूर्ण मुंबई महानगर प्रदेशातून रुग्णांचे नातेवाईक मुंबईकडे धाव घेत आहेत. काही ठिकाणी याची अधिक दराने विक्री केल्याचेही प्रकार निदर्शनास आले आहेत.

मुंबईत घाटकोपरमध्ये एस.के.ड्रिस्ट्रीब्युटर्स आणि भायखळ्याला भायखळा फार्मसी या दोन ठिकाणी हे औषध उपलब्ध आहे. घाटकोपरमध्ये हे विकत घेण्यासाठी गुरुवारी आणि शुक्रवारी नातेवाईकांची रांग लागल्याची चित्रफीतही समाजमाध्यमांमध्ये फिरत आहे. ‘मागील दोन दिवसांपासून मालच आलेला नाही. दिवसभरात किमान दोन हजारांहून अधिक फोन औषधाच्या मागणीसाठी येतात. याची छापील किंमत ४१ हजार ५०० रुपये असून या दोन्ही ठिकाणी ३१ हजार ५०० रुपयांना विक्री केली जाते. एका वेळेस ५० ते ६० कुप्या येतात आणि एका तासात विकल्याही जातात. मागणी करणाऱ्यांमध्ये रुग्णांचे नातेवाईकच अधिक आहेत’, असे  भायखळा फार्मसीतील विक्रेते सचिन वऱ्हाडे यांनी सांगितले.

‘के.जे.सोमय्या रुग्णालयात उपचार घेणाऱ्या नातेवाईकासाठी हे इंजेक्शन हवे होते. घाटकोपरमधून ३१ हजार ५०० रुपयांना विकत घेतले. दुसऱ्याच दिवशी नालासोपाऱ्याच्या रुग्णालयात उपचार घेत असलेल्या पालघरमधील रुग्णाला गरज असल्याने घाटकोपर येथे प्रयत्न केला, परंतु मिळाले नाही. अनेक ठिकाणी शोधल्यावर ४६ हजार रुपयांना विकत घ्यावे लागले. आवश्यक औषध असूनही उपलब्ध तर नाहीच. परंतु याचा फायदा घेत अनेक ठिकाणी काळाबाजार केला जात आहे. यावर मात्र कोणाचेही नियंत्रण नाही’, असे पालघरचे नगराध्यक्ष उत्तम पिंपळे यांनी सांगितले.

‘रोश’ या एकमेव औषधनिर्मिती कंपनीकडून याचे उत्पादन केले जाते. भारतात ‘सिप्ला’ कंपनी हे आयात करून खासगी रुग्णालये, सरकार, नातेवाईकांना विक्री करते. जूनच्या शेवटच्या आठवडय़ातच पालिकेच्या रुग्णालयांसाठी ४५० कुप्या कंपनीने पुरवल्याची माहिती मुंबई पालिका आयुक्त इक्बाल सिंग चहल यांनी दिली. ‘रुग्णालयांनी कंपनीकडे मागणी केल्यास औषध उपलब्ध होत आहे. तसेच एखाद्या वेळेस रुग्णालयात नसल्यास दुसऱ्या रुग्णालयाकडून मागवले जाते. त्यामुळे रुग्णालयांमध्ये याचा सध्या तुटवडा नाही’, असे बॉम्बे रुग्णालयातील सल्लागार फिजिशियन आणि पालिका व खासगी रुग्णालयांमधील मुख्य समन्वय डॉ. गौतम भन्साली यांनी सांगितले.