|| अक्षय मांडवकर

‘टोको टुकान’ आणि ‘रेड बिल टुकान’ पक्ष्यांना पाहण्यासाठी मुंबईकरांची गर्दी

nilesh sambre, kapil patil
“कपिल पाटील डोळ्यांची शस्त्रक्रिया करा”, नीलेश सांबरे यांचे खासदार कपिल पाटील यांना प्रत्युत्तर
Versova Koliwada, facilities Versova koliwada,
वर्सोवा कोळीवाड्याला सोयी-सुविधांची प्रतीक्षा
fraud of Jewellery worth rupees crores in thane
ठाण्यात सराफा दुकानात कर्मचाऱ्याकडून कोट्यवधींच्या दागिन्यांचा अपहार
lok sabha election 2024 bjp face hurdle over maharashtra seat sharing deal with shinde shiv sena
कोंडी कायम; शिंदे, पवारांचा अधिक जागांवर दावा; ठाण्यासाठी भाजपचा आग्रह, मनसेच्या समावेशास शिवसेनेचा विरोध

गेल्या तीन दिवसांपासून मुंबईकर तब्बल सात लाख रुपये किमतीच्या मध्य-दक्षिण अमेरिकेतल्या जंगलामध्ये वास्तव्य करणाऱ्या ‘टोको टुकान’ या पक्ष्याचे दर्शन घेत आहेत. अंधेरीमध्ये भरविण्यात आलेल्या ‘वर्ल्ड ऑफ पेट्स’ प्रदर्शनाच्या निमित्ताने हा पक्षी पहिल्यांदाच मुंबईकरांना पाहता येत आहे. याशिवाय याच पक्ष्याच्या प्रजातीमधला ‘रेड बिल टुकान’ पक्षीसुद्धा लोकांची गर्दी खेचत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात या पक्ष्याची किंमत सुमारे अडीच ते तीन लाख रुपयांच्या घरात आहे.

अंधेरीतील भवन्स नॅचर अ‍ॅण्ड अ‍ॅडव्हेंचर केंद्रामध्ये सुरू असलेल्या प्रदर्शनाच्या निमित्ताने देशी-विदेशी पक्षी, प्राणी आणि समुद्री जीवांना पाहण्याची संधी प्राणिप्रेमी तसेच मुंबईकरांना मिळत आहे. मात्र या प्रदर्शनामध्ये ‘टुकान’ जातीचे पक्षी आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरत आहेत. प्रदर्शनासाठी खास पुण्यावरून ‘टोको टुकान’ आणि ‘रेड बिल टुकान’ हे दोन्ही पक्षी मुंबईत दाखल झाले आहेत. या दोन्ही पक्ष्यांचे दर्शन मुंबईकरांना प्रथमच घडत आहे. पुण्यातील सिंहगड रोडवर राहणारे पक्षिप्रेमी लौकिक सोमण यांच्या खासगी पक्षी संग्रहामध्ये या पक्ष्यांचा समावेश आहे. ‘टोको टुकान’ पक्ष्यांचा मूळ अधिवास मध्य-दक्षिण अमेरिकेच्या उष्णकटीबंधीय जंगलामधील आहे. बंदिस्त अधिवासात हे पक्षी फळांचे सेवन करतात.

मात्र नैसर्गिक अधिवासात हे पक्षी इतर पक्ष्यांची अंडीदेखील खातात. या पक्ष्याचा आकार साधारण ६३ सेंटिमीटर असून त्याचे वजन ५०० ते ८५० ग्रॅमपर्यंत असते. हे पक्षी १८ वर्षांपर्यंत जगतात. सुमारे २० सेंटिमीटरची आकर्षक चोच आणि त्यावरील रंगांमुळे या पक्ष्याला भारतात मागणी आहे. ‘रेड बिल टुकान’ पक्ष्यांचा अधिवास दक्षिण अमेरिकेमधील असून त्याचा आकारही टोको टुकानएवढाच असतो. या पक्ष्यांची चोच लाल रंगाची असल्याने त्याला ‘रेड बिल टुकान’ म्हटले जाते. साधारण २० वर्षांपर्यंत जगणाऱ्या या पक्ष्यांचा मुख्य आहार फळे आहेत. गेल्या दीड वर्षांपासून ‘टोको टुकान’ पक्ष्याचा सांभाळ करत असल्याची माहिती या पक्ष्याचे मालक लौकिक  सोमण यांनी दिली. चेन्नईहून या दोन्ही पक्ष्यांना विकत घेतल्याचे त्यांनी सांगितले.  तसेच बंदिस्त अधिवासात हे पक्षी मृदू फळांचे सेवन करत असल्याचे सोमण म्हणाले. प्रजननाच्या माध्यमातून पैदास करण्यात आलेल्या विदेशी पक्ष्यांना भारतामध्ये पाळले जात असल्याने पक्ष्यांच्या बाजारात ‘टुकान’ला मोठी मागणी असल्याची माहिती भवन्स नॅचर अ‍ॅण्ड अ‍ॅडव्हेंचर केंद्राचे प्रमुख हिमांशु प्रेम यांनी दिली. मुंबईकरांना ‘टुकान’ पक्ष्यांचे दर्शन घडविण्याच्या उद्देशाने त्यांना प्रदर्शनामध्ये सामील करून घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. याखेरीज प्रदर्शनामध्ये ऑस्ट्रेलिया, आफ्रिका, चीन या देशांमधीलही सुमारे १२० जातींचे पक्षी असून त्यात पोपट, कनूर जातीचे रंगीबेरंगी पक्षी, लव्ह बर्ड्स, जपानी कोंबडय़ा, परदेशी कबुतर यांचा समावेश आहे.