मराठी रंगभूमी तसेच छोटय़ा आणि मोठय़ा पडद्यावर आपल्या प्रसन्न व्यक्तिमत्त्वाची छाप पाडणारे चतुरस्र अभिनेते प्रशांत दामले यांच्याशी खुसखुशीत गप्पांचा योग आज, शुक्रवारी ‘लोकसत्ता’च्या ‘सहज बोलता बोलता’ कार्यक्रमाच्या निमित्ताने जुळून आला आहे.

नाटकात मनापासून रमलेल्या प्रशांत दामलेंना प्रयोगांचा विक्रमादित्य असेही म्हटले जाते. कारण सर्वाधिक नाटकांचे प्रयोग करण्याचा विक्रमही त्यांच्या नावावर आहेत. खाणे, गाणे आणि नाटक या तिन्हींचे अजब रसायन त्यांच्यात आहे. दामले यांच्या नाटय़प्रवासाचे साक्षीदार आणि त्यांच्या नाटकांचे दिग्दर्शक  मंगेश कदम त्यांच्याशी संवाद साधतील. नव्वदच्या दशकात  ‘बेस्ट’ची नोकरी सांभाळत सुरू झालेला प्रशांत दामले यांच्या अभिनयाचा आलेख नाटक-चित्रपट अशा विविध माध्यमांतून उंचावत गेला.  मराठी नाटके सातासमुद्रापार नेणाऱ्या आणि छोटय़ा पडद्यावर खवय्येगिरीचे कार्यक्रमही आपल्या प्रसन्न शैलीने लोकप्रिय करणाऱ्या प्रशांत दामलेंसारख्या अभिनेत्याशी होणारी ही गप्पांची मैफल अविस्मरणीय ठरेल.

सहभागासाठी   https://tiny.cc/LS_SahajBoltaBolta_25Sept  येथे नोंदणी आवश्यक