मुंबई आणि परिसरात असलेल्या मराठवाडावासियांच्या विविध संघटनांतर्फे २८ आणि २९ नोव्हेंबर रोजी मुंबईत मराठवाडा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. मुंबईतील मराठवाडावासीयाना एकत्र आणून त्यांच्यासाठी एकत्र व्यासपीठ निर्माण करण्याच्या उद्देशाने या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
२८ आणि २९ नोव्हेंबर या दोन्ही दिवशी सकाळी साडेनऊ ते रात्री साडेनऊ या वेळेत हा महोत्सव होणार आहे. रंगशारदा सभागृह, लिलावती रुग्णालयासमोर, वांद्रे (पश्चिम) येथे २८ तारखेला सकाळी दहा वाजता महोत्सवाचे होणार आहे.
कार्यक्रमास मराठवाडयातील अनेक नामवंत सहभागी होणार आहेत. साहित्यिक परिसंवाद, कथाकथन, काव्यवाचन, औद्योगिक विकासावर चर्चासत्र, पाणी प्रश्न व दुष्काळावर कायमस्वरूपी मात करण्यासाठी तज्ञाचे मार्गदर्शन, संगीत , कला , पुस्तक प्रदर्शन, बचत गटाचे प्रदर्शन, मुक्त व्यासपीठ असे विविध कार्यक्रम दोन दिवसांच्या महोत्सवात होणार आहेत.
मराठवाडय़ाच्या अनेक भागात दुष्काळी परिस्थिती असल्याने महोत्सव साधेपणाने साजरा करण्यात येणार असून जमा होणाऱ्या निधीतून ‘मुख्यमंत्री निधी’स मदत केली जाणार आहे. अधिक माहिती http://www.marathwadamahotsav.com या संकेतस्थळावर मिळू शकेल.