बॉम्ब ठेवणाऱ्या मुझम्मिलला फाशी देण्याची मागणी

डिसेंबर २००२ ते मार्च २००३ या दरम्यान मुंबई सेंट्रल स्थानकातील मॅक्डोनाल्डमध्ये, विलेपार्ले पूर्व परिसरातील बाजारात, तर छत्रपती शिवाजी टर्मिनस-कर्जत उपनगरी गाडीमधील महिलांच्या प्रथम वर्गाच्या डब्यात मुलुंड स्थानकात बॉम्बस्फोट घडवून आणण्यात आले होते. मुंबईला पुन्हा एकदा हादरवणाऱ्या घटनेशी संबंधित खटल्यात दोषी ठरवण्यात आलेल्या आरोपींच्या शिक्षेचा निर्णय विशेष ‘पोटा’ (दहशतवाद प्रतिबंधक कायदा) न्यायालय बुधवारी सुनावणार आहे. त्यातही तिन्ही बॉम्ब ठेवणाऱ्या मुझम्मिल अन्सारीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी मंगळवारी सरकारी पक्षातर्फे करण्यात आली. तर ‘सिमी’ या बंदी घालण्यात आलेल्या संघटनेचा माजी महासचिव साकीब नाचन याला जन्मठेपेची मागणी करण्यात आली.

मुझम्मिल व नाचनसह १० जणांना न्यायालयाने दोषी ठरवले आहे. कट रचणे आणि बॉम्ब ठेवण्याच्या मुख्य आरोपासह एकूण १८ आरोपांत न्यायालयाने मुझम्मिलला दोषी ठरवले आहे, तर साकीबची न्यायालयाने दहशतवादाच्या आरोपातून सुटका करत शस्त्रास्त्र बाळगल्याप्रकरणी दोषी ठरवले आहे.

विशेष सरकारी वकील रोहिणी सालियान यांनी आरोपींना कठोर शिक्षा देण्याची मागणी न्यायालयाकडे केली. तिन्ही बॉम्ब ठेवणाऱ्या मुझम्मिलला फाशीची शिक्षा सुनावण्याची मागणी सालियान यांनी केली. पहिला बॉम्ब ठेवल्यानंतरही मुझम्मिल थांबला नाही. त्याने पुढील दोन बॉम्बही ठेवले. वास्तविक पहिल्या घटनेनंतर झालेल्या रक्तपातानंतर माघार घ्यायची त्याला संधी होती; परंतु त्याने तसे न करता त्याने दहशत पसरवण्यासाठी आणखी दोन बॉम्ब ठेवले. त्यामुळे त्याला कुठल्याही प्रकारची दया दाखवण्याचा प्रश्नच येत नाही, असा दावा करत सालियान यांनी त्याला फाशीची शिक्षा सुनावण्याची मागणी केली.

तर साकीब नाचन याच्यावर यापूर्वीही दहशतवादाचे आरोप ठेवण्यात आलेले आहेत. डॉ. वाहिद अन्सारी याच्या दवाखान्यात बॉम्ब ठेवण्यात आले होते. शिवाय गुलाम खोतल आणि फरहान खोत या दोघांनीही बॉम्बस्फोटांमध्ये महत्त्वाची भूमिका निभावली आहे.