करोनाविरोधी लढय़ाचे नेतृत्व करणारे राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे आज ‘लोकसत्ता विश्लेषण’च्या उपक्रमात सहभागी होणार आहेत. सायंकाळी ५ वाजता हा वेबसंवाद होईल. करोना प्रादुर्भाव रोखण्याच्या उपाययोजनांचा आढावा आणि सद्य:स्थिती त्यांच्याकडून समजून घेता येईल.

राज्यात मार्चच्या पहिल्या आठवडय़ात करोनाचा उद्रेक सुरू झाला. करोना प्रतिबंध करून आपण ही लढाई जिंकणार, असा विश्वास भयभीत झालेल्या नागरिकांना आरोग्यमंत्र्यांनी त्या वेळी दिला होता. आरोग्यमंत्र्यांनी अधिकाधिक चाचण्यांसाठी जिल्ह्य़ाजिल्ह्य़ांमध्ये प्रयोगशाळा कार्यान्वित करण्यावर भर दिला. याशिवाय रुग्णांच्या विलगीकरणासाठी मोठय़ा प्रमाणावर विलगीकरण केंद्रे उभारणी करण्यासाठी आणि डॉक्टरांना अत्याधुनिक उपचारांबाबत मार्गदर्शन उपलब्ध होण्यासाठी विशेष कृती दलासह तज्ज्ञांची फळीही टोपे यांनी उभारली.

खासगी रुग्णालयांकडून होणारी शुल्क लूटमार रोखण्यासाठी रुग्णालयांतील खाटा ताब्यात घेणे, उपचार शुल्क निश्चित करणे, रुग्णवाहिका उपलब्ध करणे इत्यादी निर्णय टोपे यांनी घेतले. त्यामुळे धारावीसारख्या मोठय़ा झोपडपट्टीमध्ये करोनाचा फैलाव तीन महिन्यांत आटोक्यात आणण्यात यश आले.

प्रभावी रणनीती..

* देशात महाराष्ट्रात सर्वाधिक करोना रुग्ण आढळत होते आणि सर्वाधिक बळीही जात होते. त्यामुळे सातत्याने टीकेचे लक्ष्य ठरूनही संयमाने टोपे यांनी सुनियोजित पद्धतीने करोनाविरोधातील रणनीतीची आखणी केली. त्यांचे हे अनुभव वेबसंवादातून ऐकता येतील.

* मुंबई, पुणे वगळता राज्याच्या अन्य भागांमध्ये आरोग्य व्यवस्था पुरेशी सक्षम नाही. मनुष्यबळाचीही कमतरता आहे. अशा परिस्थितीत करोना नियंत्रण आव्हानात्मक आहे. करोनाचा उद्रेक पुन्हा होईल, असा इशारा दिला जात आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने कोणती पूर्वतयारी केली, याचा उलगडाही या संवादातून होईल.

सहभागी होण्यासाठी https://tiny.cc/LS_Vishleshan_11Aug  येथे नोंदणी आवश्यक.