आज आपण क्रांतीकारक पाऊल टाकत आहोत. या बद्दल कुणाचही दुमत असण्याची शक्यता नाही. हेच ते ठिकाण आहे जे करोना रुग्णांनी तुडूंब भरून वाहत होतं. मात्र, जीवाची पर्वा न करता करोना रुग्णांची सेवा करणाऱ्यांना मी मानाचा मजुरा करतो. असं म्हणत आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोविड योद्ध्यांबरोबरच मुंबई महापालिका प्रशासनाचेही अभिनंदन केले.

राज्याव्यापी लसीकरण मोहिमेची सुरुवात मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या हस्ते आज  मुंबई महापालिकेच्या वांद्रे-कुर्ला संकुलामधील कोविड सुविधा केंद्रात झाली. यावेळी ते बोलत होते. मुंबईमधील एकूण ९ केंद्रांवरील ४० बूथवर लसीकरण केले जाणार आहे.

बीकेसीमधी लसीकरण केंद्रावर महापौर किशोरी पेडणेकर, पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे, मुंबई महापालिका आयुक्त इक्बाल चहल यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी मुख्यमंत्री म्हणाले, ”ते दिवस आठवल्यानंतर आजही अंगावरती शहारे येतात. दिवस-रात्र एकच चिंता होती, तणाव होता. काही हाताशी नसताना पुढे कसं जायचं? हा एक मोठा प्रश्न होता. पण त्या सर्व संकटाच्या काळात ही सर्व लोकं जर आमच्या सोबत नसती, तर आजचं कोविड सेंटर हे अशाप्रकारे पाहायला मिळालं नसतं. हे कोविड सेंटर लसीकरण केंद्राच्या रुपातच पाहायला मिळो असं मला वाटतं.”

लसीकरणाबद्दल पंतप्रधान मोदींचं नागरिकांना महत्त्वाचं आवाहन; म्हणाले…

”आपल्या सर्वांना कल्पना आहेच, सुरुवातीच्या काळात मुंबई असो किंवा मग संपूर्ण जगभरात रुग्णालयं अपुरी पडत होती. रुग्णांना बेड मिळत नव्हते. तेव्हा मग युद्धजन्य परिस्थितीत ज्याप्रकारे एखादं काम केलं जातं, त्या प्रकारे काम करून हे कोविड सेंटर उभारण्यात आलं. अनेकांना वाटत होतं, कसं होईल? मात्र हे कोविड सेंटर उभारल्यानंतर आपण मुंबईत आणखी कोविड सेंटर्स उभारली, राज्यामध्ये उभारली आणि यामुळे खूप मोठा आधार आपल्याला मिळाला.”

… अखेर तो दिवस उजाडला! आजपासून देशभरात प्रत्यक्ष लसीकरणाची सुरूवात

तसेच, ”आज जो क्रांतीकाकर दिवस उजाडलेला आहे. अनेक दिवस आपण ऐकत होतो लस येणार-येणार पण लस काही येत नव्हती. आज लस आपल्या हाती आलेली आहे. परंतु एक मी नम्रपणे सर्वांना सांगू इच्छितो, अजूनही संकट टळलेलं नाही. अनेकांना असं वाटू शकतं की आता लस आली आहे, त्यामुळे काही होऊ शकतं. परंतू असं नाही आता सुरूवात होत आहे, सर्वांना लस मिळेपर्यंत काही दिवस- महिने लागणार आहेत. या लसींचा प्रभाव किती काळ राहणार हे काही दिवस उलटल्यानंतरच कळणार आहे. लस तर आलेली आहे परंतू सर्वांत उत्तम लस म्हणजे आपल्या तोंडावर असलेला मास्क हीच आहे, त्यामुळे मास्कचा वापर न करून जमणार नाही. लस घेतल्यानंतर देखील मास्क वापरावाच लागेल. कारण, आतापर्यंत आपण या संकटाला जे सामोरं गेलो आहोत, ते तीन सूत्रांच्या बळावरच. ते म्हणजे मास्क घाला, हात धूवा व  सुरक्षित अंतर ठेवा. या तीन सूत्रांचा जर आपल्याला विसर पडला, तर मग मात्र पुन्हा हे संकट अधिक वेगाने पुन्हा येऊ शकतं. आता सुरूवात तर झाली आहे पण करोनाचा शेवट आपल्याला करायचा आहे.” असं देखील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.