दरमहा प्रत्येकी ५० रुपयांची शुल्कवसुली जास्त असल्याचे कारण; पालिकेसमोर नवा पेच

मुंबईला हागणदारीमुक्त करण्यासाठी पालिकेने तब्बल दोन हजारांहून अधिक शौचकूप उपलब्ध केले असले तरी त्यांच्या वापराकरिता पैसे द्यावे लागत असल्याने सर्वसामान्यांनी त्याकडे पाठ फिरविली आहे. पालिकेने उपलब्ध करून दिलेल्या शौचालयाच्या वापरासाठी प्रतीमाणशी ५० रुपये मासिक पास आकारला जातो. मात्र, पैसे देऊन शौचालयांचा वापर करण्यास मुंबईकर तयार नसल्याने उघडय़ावरच प्रातर्विधी उरकण्याचे प्रकार सुरूच आहेत.

केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत अभियानांतर्गत हागणदारीमुक्तीसाठीही प्रशासकीय पातळीवर प्रयत्न सुरू झाले आहेत. याचाच एक भाग म्हणून मुंबई महापालिकेने सार्वजनिक शौचालय बांधण्यावर भर दिला. मुंबईमध्ये वस्त्यांजवळ तब्बल दोन हजार शौचकूप उपलब्ध करण्यात आले आहे आणि आणखी दोन हजार शौचकूपांचे बांधकाम सुरू आहे.

या शौचालयांची देखभाल करण्यासाठी वस्त्यांमधील रहिवाशांच्या सामाजिक संस्थेकडे जबाबदारी सोपविण्यात आली आहे. शौचालयाच्या वापरासाठी रहिवाशांना दर महिन्याला माणशी ५० रुपयांचा पास देण्याची योजना सुरू करण्यात आली आहे. दर महिन्याला ५० रुपये देऊन या पासचे नूतनीकरण करावे लागणार आहे. मात्र हा पास घेण्यास झोपडपट्टीतील रहिवाशी तयार नाहीत.   एका कुटुंबात पाच-सहा सदस्य असले तर दर महिन्यालाय शौचालयाच्या वापरासाठी २५० ते ३०० रुपये मोजावे लागतील. मोलमजुरी करुन कुटुंबाचा कसाबसा उदरनिर्वाह सुरू असताना आता शौचालयासाठी पैसे आणायचे कुठून असा सवाल रहिवाशी करू लागले आहेत. त्यांच्या असहकारामुळे मुंबईत राबविण्यात येत असलेले ‘स्वच्छ भारत अभियान’च धोक्यात येण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.