18 September 2020

News Flash

नांदेडमध्ये शौचालय क्रांती!

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वच्छ भारत अभियानाला राज्यात अधिकाधिक गती मिळावी यासाठी तयार शौचालये कंत्राटदारांमार्फत लाभार्थीपर्यंत पुरवून कंत्राटदारांचे उखळ पांढरे करण्याचे धोरण विद्यमान भाजप-शिवसेना सरकार

| April 12, 2015 04:24 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वच्छ भारत अभियानाला राज्यात अधिकाधिक गती मिळावी यासाठी तयार शौचालये कंत्राटदारांमार्फत लाभार्थीपर्यंत पुरवून कंत्राटदारांचे उखळ पांढरे करण्याचे धोरण विद्यमान भाजप-शिवसेना सरकार आखत असतानाच नांदेडमध्ये एका मुख्य अधिकाऱ्याने गेल्या सहा महिन्यांत mu02लोकांच्याच सहभागाने तब्बल ६० हजार शौचालयांची उभारणी केली आहे. शौचालय बांधल्याचे आणि त्याचा वापर सुरू झाल्याचे निश्चित केल्यानंतरच लाभार्थीला अनुदान दिले जात आहे.
मोदी यांनी स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत घराघरात शौचालय उभारण्यासाठी केंद्र शासनाकडूनही मदत देण्याचे जाहीर करण्याआधीपासूनच नांदेडमध्ये ही मोहिम सुरू झाली होती. नांदेड जिल्हा परिषदेचे विद्यमान मुख्य अधिकारी अभिमन्यू काळे यांनी सुरुवातीला कार्यभार स्वीकारला तेव्हापासूनच ते घराघरांत शौचालय उभारून गावे हगणदारी मुक्त करण्याचा उपक्रम राबविण्यास सुरुवात केली. जिल्हा परिषदेतील सदस्यांनी सुरुवातीला काळे यांच्या या उपक्रमाला जोरदार विरोध केला. परंतु मुख्य अधिकाऱ्यांकडून इमानेइतबारे ही योजना राबविली जात आहे हे पाहून नंतर पाठिंबा देण्यास सुरुवात केली.
काळे यांनी मुख्य अधिकारीपदाची सूत्रे स्वीकारली तेव्हा शौचालय बांधण्याबाबतचा निधी पडून असल्याचे त्यांच्या निदर्शनास आणले. त्यांनी सर्व ग्रामसेवकांची तातडीने बैठक बोलाविली आणि या सर्वाना घराघरात शौचालय बांधण्याची प्रवृत्त केले. या उपक्रमाला सुरुवातीला महिला ग्रामसेवकांनीही विरोध केला. आता आम्ही घरोघरी शौचालये बांधली जात आहेत किंवा नाही हे तपासू का, असा सवाल केला. त्यामुळे यापैकी अनेकांनी असहकारही पुकारला. परंतु तुम्हाला काम करायचे नसेल तर मला निलंबित करावे लागेल, अशी धमकी दिल्यानंतर त्याचा योग्य तो परिणाम झाला आणि सर्व ग्रामसेविका कामाला लागल्या. त्याचाच हा परिणाम असल्याचे काळे सांगतात. आता परिस्थिती अशी आहे की, शौचालये बांधण्यासाठी ग्रामस्थ पुढे येत आहेत आणि निधी कमी पडत आहे. शौचालयासोबत न्हानीघरही ग्रामस्थांकडून बांधले जात आहे आणि तेही दिलेल्या अनुदानातच. या शौचालयांचा वापरही होत आहे, असे आपण ठामपणे सांगू शकतो, असेही त्यांनी स्पष्ट केले. शासनाच्या एका समितीनेही इतक्या वेगाने शौचालये बांधली जात असल्याबाबत तपासणी केली तेव्हा त्यांनाही वस्तुस्थिती आढळून आली, असेही काळे यांनी सांगितले.
आपण आज प्रत्येक गावात जाऊन या उपक्रमाचे महत्त्व विशद करीत आहोत आणि ग्रामस्थांनाही आपण शौचालय बांधल्यानंतर त्याची तपासणी झाल्यानंतर निधी कुठलीही टक्केवारी न घेता आपल्या हातात पडत आहे, याचा अनुभव येत असल्यामुळे अनेक ग्रामस्थ पुढे येत असल्याचेही काळे यांनी सांगितले. जिल्हाधिकारी धीरज कुमार यांनीदेखील स्वत: पाहणी करून या उपक्रमाची प्रशंसा केल्याचे त्यांनी सांगितले. ज्या ग्रामसेवकांनी शौचालये उभारणे लक्ष्य पूर्ण केले आहे त्यांचा सत्कारही केला जात असल्याचे काळे यांनी सांगितले. नांदेड जिल्हा परिषदेच्या संकेतस्थळावर या सर्व शौचालयांची छायाचित्रेही टाकण्यात आली आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 12, 2015 4:24 am

Web Title: toilet revolution in nanded
Next Stories
1 ग्रंथपालांची सरकारच्या विरोधात अवमान याचिका
2 ‘ग्लोबल बिझनेस फोरम’ची स्थापना
3 १२ वर्षांची फरफट..
Just Now!
X