शौचालय क्रांती, डासमुक्तीपाठोपाठ नांदेड जि.प.चा नवा उपक्रम
एक लाख शौचालये उभारून आगळ्या पद्धतीने क्रांती तसेच प्रत्येक गाव डासमुक्त करण्याचा विडा उचलल्यानंतर नांदेड जिल्हा परिषदेने आनंददायी शाळेचा उपक्रम यशस्वी केला आहे. सुटीतही शाळा सुरू ठेवून विद्यार्थ्यांना मनसोक्त बागडण्याची संधी या शाळांनी उपलब्ध करून दिली असून त्याला मुलांनीही चांगला प्रतिसाद दिला आहे. घरी बसण्यापेक्षा शाळेत जाऊन मनाला वाट्टेल ते करण्याची इच्छा या निमित्ताने मुलांना उपलब्ध करून देण्यात आली आहे.
नांदेड जिल्हा परिषदेतील शाळा सकाळी दहानंतर सुरू होत होत्या. या शाळा लवकर सुरू व्हाव्यात यासाठी सुरुवातीला प्रयत्न केले गेले तेव्हा शिक्षकांनी विरोध केला. परंतु शिक्षकांना बंधन न घालता आठ वाजता शाळा सुरू करण्याचे ठरविण्यात आले. या संकल्पनेला मुलांनी भरभरून प्रतिसाद दिला. आठ वाजताच पटसंख्येतील ६० ते ७० टक्के मुले हजर राहू लागली. काही शिक्षकही मग ऐच्छिकरीत्या या उपक्रमात सहभागी होऊ लागले. त्यातूनच सुट्टीतील शाळा सुरू करण्याची संकल्पना नांदेड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिमन्यू काळे यांना सुचली. सुटीत मुलांनी वेळेचा सदुपयोग करावा आणि त्यांच्या अंगी असलेल्या गुणांना वाव मिळावा, या हेतूने ही संकल्पना राबविण्याचे त्यांनी ठरविले. अर्थात या संकल्पनेलाही शिक्षकांचा विरोध झाल्यामुळे हेही ऐच्छिक ठेवण्यात आले. परंतु मुलांचा प्रतिसाद पाहिल्यानंतर सुटीतील आनंददायी शाळा ही संकल्पना संपूर्ण जिल्ह्य़ात राबविण्यात आली. या शाळांना मुले सकाळपासूनच हजेरी लावतात. ३० ते ६० टक्के उपस्थिती असते, असे काळे यांनी सांगितले. उन्हाळ्यात घरी राहण्यापेक्षा मुलांना शाळा अधिक आल्हाददायक वाटाव्यात यासाठीही आवश्यक त्या सुधारणा करण्यात आल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

जिल्ह्य़ाचे मुख्य अधिकारीपद स्वीकारल्यानंतर जेव्हा शौचालयांची उभारणी तसेच डासमुक्त गावांची संकल्पना मांडली तेव्हा मला वेडय़ात काढण्यात आले. परंतु गावात प्रत्यक्ष मुक्काम करून ही संकल्पना यशस्वी केली. आनंददायी शाळा हा उपक्रम मुलांना स्वच्छंदपणे बागडण्याची संधी देतो.
– अभिमन्यू काळे, मुख्य अधिकारी, नांदेड जिल्हा परिषद