निकष धाब्यावर बसवून शौचकुपांसाठी मोठय़ा आकारमानाच्या खोल्या बांधायच्या आणि महापालिकेच्या तिजोरीवर डल्ला मारायचा, असा कारभार सध्या कंत्राटदारांकडून सुरू आहे. मुंबईमध्ये अनेक ठिकाणी अशा प्रकारची मोठय़ा आकारमानाची शौचकुपे बांधण्यात आली असून कंत्राटदारांचा हा भ्रष्टाचार उघडकीस आला आहे.

शौचकूप असलेल्या खोलीचे आकारमान ३ बाय ४ फूट असावे, असा निकष आहे; परंतु कंत्राटदारांनी प्रत्यक्षात अनेक ठिकाणी बांधलेल्या शौचालयांमध्ये शौचकुपासाठी ५.५ बाय ५.५ चौरस फुटांच्या खोल्या बांधल्याचे निदर्शनास आले आहे. शौचकुपांच्या खोलीचे आकारमान मोठे ठेवल्यामुळे आपसूकच त्यांची संख्या कमी झाली. इतकेच नव्हे तर शौचकूप, टाइल्स, दोन शौचकुपांमधील भिंत आदींवरील खर्च वाढवून त्यावर डल्ला मारण्याचे कंत्राटदारांचे षड्यंत्र पालिका प्रशासनाने उघडकीस आणले आहे. त्यामुळे आता सार्वजनिक शौचालयांमधील शौचकुपांच्या खोल्यांचे आकारमान एक चौरस फुटाने कमी करून शौचकुपांची संख्या वाढविण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. त्यामुळे झोपडपट्टय़ांमधील रहिवाशांना मोठय़ा संख्येने शौचालये उपलब्ध होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

शौचालयांची संख्या कमी करण्याकडे कल असलेल्या कंत्राटदारांना वेसण घालण्याची तयारी पालिकेने सुरू केली आहे. शौचकुपांच्या आकारमानाची बाब मुलुंड येथील पालिकेच्या विभाग कार्यालयाचे साहाय्यक आयुक्त किशोर गांधी यांनी पालिका मुख्यालयात शनिवारी झालेल्या पालिका अधिकाऱ्यांच्या आढावा बैठकीत पालिका आयुक्त अजोय मेहता यांच्या निदर्शनास आणून दिली. भविष्यात शौचकुपांसाठी ५.५ बाय ५.५ चौरस फुटांऐवजी ४.५ बाय ४.५ चौरस फूट आकारमानाची खोली बांधण्यात यावी, असे निर्देश अजोय मेहता यांनी दिले.

* ‘मुंबई मलनिस्सारण प्रकल्पा’अंतर्गत ‘वस्ती स्वच्छता कार्यक्रमा’द्वारे झोपडपट्टय़ा, वस्त्यांमध्ये सार्वजनिक शौचालये बांधण्यात येतात.

*  या शौचालयांची देखभाल वस्तीमधील मंडळ अथवा संस्थेमार्फत केली जाते.

* या शौचालयांच्या वापरासाठी रहिवाशांना मासिक पास देण्यात येतात.

* मासिक पासच्या रूपात मिळणाऱ्या निधीतून शौचालयाची देखभाल केली जाते.

* या शौचालयांच्या बांधकामासाठी कंत्राटदारांना कंत्राट देण्यात येते.

* कंत्राटदार शौचालयाचा आराखडा सादर करून त्यानुसार त्याची उभारणी करतात.

* एकमजली शौचालयाची बांधणी करताना मोठा जिना, शौचालयात पुरेशी मोकळी जागा, देखभाल करणाऱ्या कर्मचाऱ्यासाठी मोठी जागा नकाशात दाखविण्यात येते आणि त्याप्रमाणेच ही शौचालये बांधली जातात.

शौचकूप खोलीचे आकार मोठे ठेवल्यानंतर बांधकामावरील खर्च कमी होतो, पण शौचकुपांची संख्याही कमी होते. समोरासमोर बांधण्यात येणाऱ्या शौचकुपांमध्ये मोकळी जागा ठेवणे, एकमजली शौचालयासाठी मोठा जिना, देखभाल करणाऱ्यासाठी मोठी खोली यामुळे शौचकुपांची संख्या कमी झाली आहे. एकमजली शौचकुपांसाठी ४.५ बाय ४.५ चौरस फूट, तर बैठय़ा शौचालयासाठी ३.५ बाय ३.५ चौरस फूट अथवा ४ बाय ४ चौरस फूट आकारमानाच्या खोल्या बांधल्यास शौचकुपांची संख्या वाढू शकेल. बोरिवली परिसरात हा प्रयोग यशस्वी ठरला आहे. आता याच पद्धतीनुसार मुलुंडमध्ये दोन शौचालये बांधण्यात येत आहेत. शौचकुपांची संख्या वाढल्यास झोपडपट्टय़ांमधील नागरिकांची गौरसोय टाळता येऊ शकेल.

– किशोर गांधी, साहाय्यक आयुक्त, मुलुंड