टोलविरोधातील रास्ता रोको आंदोलनात तोडफोड न करण्याची सूचना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मंगळवारी पक्षाच्या कार्यकर्त्यांना केली. टोलविरोधात शांततेने मोर्चा काढून टोल असलेले महामार्ग जाम करावे, असे राज ठाकरे यांनी म्हटले आहे. प्रतिबंधात्मक कारवाई म्हणून पोलीस मंगळवारी रात्रीच कार्यकर्त्यांना आणि पदाधिकाऱयांना अटक करण्याची शक्यता असल्यामुळे सर्वांना काळजी घेण्याची सूचनाही राज ठाकरे यांनी केली.
टोलवसुलीमध्ये पारदर्शकता नसल्यामुळे मनसेने बुधवारी राज्यभर रास्ता रोको आंदोलन करण्याचे जाहीर केले आहे. आंदोलनाला हिंसक वळण लागण्याची शक्यता असल्यामुळे पोलीसांनी आधीपासूनच राज ठाकरे यांच्यासह मनसेच्या पदाधिकाऱयांना प्रतिबंधात्मक नोटिसा बजावल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी त्यांच्या ‘कृष्णकुंज’ निवासस्थानी पक्षातील महत्त्वाच्या पदाधिकाऱयांची आणि नेत्यांची बैठक घेतली. या बैठकीतच आंदोलनाचे स्वरुप निश्चित करण्यात आले.
लोकांना त्रास होईल, असे काही करू नका, असे राज ठाकरे यांनी स्पष्ट केले. आंदोलन शांततेने करावे त्याचबरोबर कुठेही तोडफोड करू नये, असे त्यांनी पदाधिकाऱयांना सांगितले.