राज ठाकरे यांनी पुकारलेल्या टोलविरोधी आंदोलनानंतर या प्रश्नावर चर्चा करण्याची तयारी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दाखविल्याने ठाकरे यांचे आंदोलन दुपारपूर्वीच स्थगित करण्यात आले आणि आंदोलनाच्या चाहुलीने धास्तावलेली मुंबई सुरळीत झाली. सकाळी कृष्णभुवन या आपल्या निवास्थानाहून दहाच्या सुमारस वाशी येथे आंदोलनासाठी निघालेल्या राज यांना चेंबूर येथेच पोलिसांनी ताब्यात घेतले. यानंतर राज यांची मुख्यमंत्र्यांशी दूरध्वनीवरून चर्चा झाल्यानंतर राज यांना सोडून देण्यात आले. यावेळी राज म्हणाले, लोकांना त्रास व्हावा हा आंदोलनाचा उद्देशच नव्हता. ज्या कारणांसाठी आंदोलन केले तो सफल झाला असून मुख्यमंत्र्यांशी उद्या चर्चा झाल्यानंतर आंदोलनाची पुढील दिशा निश्चित केली जाईल. मनसेच्या आंदोलनामुळे महामार्ग जाम होतील आणि वाहतूक संपूर्णपणे कोलमडून पडेल हा राज यांच्यासह मनसेच्या नेत्यांचा असलेला अंदाज पोलिसांच्या जय्यत तयारीमुळे फसला.
पुणे येथील सभेत टोलच्या भ्रष्टाचाराचा पंचनामा करतानाच राज यांनी बुधवारी राज्यव्यापी रास्ता रोको करण्याचे जाहीर केले. या आंदोलनाचे नेतृत्व आपण स्वत: करणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले. बारावीच्या परीक्षा लक्षात घेऊन केवळ महामार्गावर आंदोलन करण्यात येणार असून आंदोलन शांततापूर्ण असेल असे त्यांनी मंगळवारी यासंदर्भात घेतलेल्या पत्रकार परिषदेत जाहीर केले होते.
राज ठाकरे बुधवारी सकाळी वाशी येथे आंदोलन करण्यासाठी निघण्यापूर्वीच मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी राज्यात जागोजागी महागार्मावर आंदोलन करण्यास सुरुवात केली. राज सकाळी दहाच्या सुमारास कृष्णभुवन या निवासस्थानाहून निघाले. त्यावेळी त्यांच्यासमवेत आमदार बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई यांच्यासह शेकडो कार्यकर्ते होते. राज यांच्या गाडय़ांचा ताफा चेंबूरपाशी येताच पोलिसांनी त्यांच्या गाडय़ा अडविल्या. वाशीला शांततापूर्णआंदोलन करणार असल्याचे सांगूनही पोलिसांनी राज यांना ताब्यात घेऊन आरसीएफ पोलीस ठाण्यात नेले. त्यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी राज यांना सोडून देण्यासाठी शेकडो कार्यकर्त्यांसह तेथेच ठिय्या आंदोलन सुरू केले. राज यांच्या अटकेचे वृत्त पसरताच मुंबईतील अनेक भागांत मनसेच्या कार्यकर्त्यांनी दुकाने बंद करण्यास सुरुवात केली तर औरंगाबाद, पुणे आदी ठिकाणी संतप्त मनसैनिकांनी बसेसवर दगडफेक सुरु केली. मात्र तासाभराच्या या अटकनाटय़ात मुख्यमंत्र्यांनी राज यांच्याशी दूरध्वनीवर संपर्क साधून उद्या सकाळी नऊ वाजता चर्चेसाठी येण्यास सांगितले त्यानंतर पोलिसांनी राज यांना सोडून दिले. यानंतर पत्रकारांशी बोलताना ज्या उद्देशाने आपण आंदोलन केले ते यशस्वी झाले असून कार्यकर्त्यांनी शांतता राखावी असे आवाहन राज यांनी केले.
मनसेचे आमदार शिशीर शिंदे, राम कदम, प्रवीण दरेकर यांच्यासह मुंबईतील आमदार व प्रमुख पदाधिकाऱ्यांना सकाळीच पोलिसांनी ताब्यात घेतले. नाशिक येथे वसंत गिते व भोसले यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले तर पुण्यासह राज्यभरात मनसेच्या आंदोलन करण्याच्या तयारीत असलेल्या कार्यकर्त्यांना साळीच ताब्यात घेतल्यामुळे महामार्ग संपर्णपणे जाम करणे मनसेला शक्य झाले नाही.