गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांना राज्य सरकार पावले. गणेशोत्सवादरम्यान कोकणात ये-जा करणाऱ्या राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) गाडय़ांना टोलमाफी देण्याचा निर्णय मंगळवारी सरकारने घेतला. मात्र खासगी गाडय़ांनाही टोलमाफी देण्याची मागणी फेटाळण्यात आली.
गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या एसटी गाडय़ांना टोलमाफी देण्याबाबत आज मंत्रालयात झालेल्या बैठकीस परिवहनमंत्री दिवाकर रावते, सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील,  सिंधुदुर्गचे पालकमंत्री दीपक केसरकर,रत्नागिरीचे पालकमंत्री रवींद्र वायकर यांच्यासह सार्वजनिक बांधकाम, रस्ते विकास महामंडळ, गृह विभागाचे अधिकारी उपस्थित होते. मुंबईतून कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांचा प्रवास सुखकर, सुरक्षित आणि जलद व्हावा, त्यांना गणेशोत्सवाचा पुरेपूर आनंद उपभोगता यावा, या उद्देशाने सर्व यंत्रणांनी परस्पर समन्वयातून तत्पर सेवा द्यावी, अशा सूचना रावते यांनी या वेळी सर्व विभागांना केल्या.
गणपतीसाठी एसटीतर्फे गिरगाव, दादर, बोरिवली, कल्याण, परळ, पनवेल, कुला-नेहरूनगर अशा विविध ठिकाणांहून गणेशभक्तांसाठी २३०० एस. टी. बसगाडय़ांची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यांना टोलमाफी देण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. खासगी गाडय़ांनाही ही सवलत देण्याची मागणी रावते यांनी केली. मात्र कोकणात जाणाऱ्या खासगी गाडय़ांमध्ये गणपतीसाठी नेमक्या कोणत्या गाडय़ा जात आहेत याची खातरजमा करणे अवघड असल्याचे सांगत सार्वजनिक बांधकाममंत्र्यांनी  ही मागणी फेटाळून लावली. त्याचप्रमाणे मुंबई-बंगलोर राष्ट्रीय महामार्गावरूनही कोकणात गाडय़ा जातात, त्यांनाही टोलमाफी देण्याबाबत केंद्रीय परिवहनमंत्री नितीन गडकरी यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून लवकरच निर्णय होईल, अशी माहितीही या वेळी देण्यात आली.
पनवेल-चिपळूण प्रवास ५० रुपयांत
कोकणातील एसटी फुल्ल!