एसटीसह हलक्या आणि छोटय़ा चार चाकी वाहनांना राज्यातील टोलमधून वगळण्याच्या सरकारच्या निर्णयाचे सर्वत्र स्वागत होत असले तरी सरकारच्या या निर्णयातील तांत्रिक चुकीमुळे स्कूलबसना मात्र टोल भरावा लागत असल्याचे उघडकीस आले आहे. ‘लोकसत्ता’ने गुरूवारी हा गंभीर प्रकार उघडकीस आणतांच मंत्रालयात एकच धावपळ सुरू झाली. त्यानंतर स्कूलबसलाही टोलमधून वगळण्याचा निर्णय झाला असून त्याबाबतची अधिसूचना दोनच दिवसात निघेल, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम विभागातील उच्चपदस्थ सूत्रांनी दिली.
विधानसभा निवडणुकीत दिलेल्या आश्वसनांची पूर्तता करतांना सरकारने १ जूनपासून राज्यातील आणखी १२ मार्गावरील टोलनाके  कायमचे बंद तर  ५३ टोलनाक्यांवरून कार, जीप तसेच एसटी आणि स्कूलबस यांना टोलमधून वगळून जनतेला दिलासा दिला. मात्र या वाहनांना टोलमधून वगळण्याबाबत अधिसूचना काढतांना सरकार स्कूलबसचा उल्लेखच विसरून गेले. सरकारच्या या चुकीचा फायदा घेत टोल चालकांनी पुन्हा स्कूल बसकडून टोलवसूली सुरू केली आहे. आज याबाबतचे वृत्त प्रसिद्ध होताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरले. त्यानंतर खडबडून जागे झालेल्या सार्वजनिक बांधकाम विभागाने ही चुक दुरूस्त करीत स्कूलबसला टोलमधून वगळण्याबाबताच सुधारीत आदेश काढण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.