मुंब्रा बाह्यवळण मार्ग दुरुस्तीसाठी बंद ठेवण्यात आल्यानंतर गेल्या तीन महिन्यांपासून ठाणे, नवी मुंबई आणि आसपासच्या शहरांमधील रस्त्यांवर होणारी वाहतूक कोंडी लक्षात घेऊन ऐरोली आणि मुलुंड या टोलनाक्यांवरून मार्गक्रमण करणाऱ्या छोट्या खासगी वाहनांना एक महिना टोल माफ करण्यात आला आहे. याची अंमलबजावणी उद्यापासून (दि. २१ ऑगस्ट ते २३ सप्टेंबर) होणार असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. टोलनाक्यांवर लागणाऱ्या वाहनांच्या रांगा यामुळे कमी होऊन कोंडीत घट होण्याची शक्यता आहे. सरकारच्या या निर्णयामुळे छोट्या वाहनधारकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

आगामी काळ हा दहीहंडी, गणेशोत्सवसारख्या सणांचा आहे. याचा वाहतुकीवर परिणाम होऊ शकतो. तसेच सोशल मीडियावरूनही नागरिकांनी रोष व्यक्त केल्याने सरकारने हा निर्णय घेतल्याचे बोलले जाते.

मुंब्रा बाह्यवळण रस्ता खुला होईपर्यंत ऐरोली आणि मुलुंडमार्गे प्रवास करणाऱ्या वाहनांना एका ठिकाणी टोल माफ करावा, असे आदेश राज्य सरकारने महिनाभरापूर्वी दिले होते. मात्र, या आदेशांची अंमलबजावणी टोलनाका व्यवस्थापनाने केली नव्हती. आधीच्या टोलनाक्यावरील पावती आणि कूपन घेऊन पुढील टोलनाक्यावर जमा करावे, अशा सूचना वाहनचालकांना देण्यात आल्या होत्या. मात्र, कूपन देताना टोलनाक्यांवर वेळकाढूपणा केला जात असल्याच्या वाहनचालकांच्या तक्रारी होत्या. त्यातच आता सरकारने आज छोट्या वाहनांना टोलमाफीचा निर्णय जाहीर केला आहे.