07 March 2021

News Flash

खड्डेमय शीळ – कल्याण रस्त्यावर टोलवसुली सुरूच!

खड्डे पडल्यास किंवा रस्त्यांची अवस्था खराब असल्यास टोलवसुली करू नये, असे राज्य शासनाचे आदेश असले तरी शीळफाटा ते कल्याण या रस्त्यावर मोठाले खड्डे पडूनही दररोज

| September 11, 2013 01:36 am

खड्डे पडल्यास किंवा रस्त्यांची अवस्था खराब असल्यास टोलवसुली करू नये, असे राज्य शासनाचे आदेश असले तरी शीळफाटा ते कल्याण या रस्त्यावर मोठाले खड्डे पडूनही दररोज हजारो वाहनचालकांकडून टोल वसुली केली जात आहे. विशेष म्हणजे या मार्गाच्या जवळच असणारा मुंब्रा वळण रस्ता खचल्याने या मार्गावरील टोलवसुली बंद करण्यात आली आहे.
वाहतुकीची जास्त वर्दळ असलेल्या रस्त्यांची खासगीकरणातून रुंदीकरण करण्यासाठी निवड केली जाते. याद्वारे राजकारणी, अधिकारी आणि ठेकेदार या सर्वांचेच भले होते. टोलवसुली करणाऱ्या ठेकेदारांची दादागिरी वाढल्याच्या तक्रारी नेहमीच येतात. मागे काही रस्त्यांवर खड्डे पडूनही टोलवसुली केली जात असल्याच्या तक्रारी आल्यावर खड्डे पडल्यास त्या रस्त्यावर टोलवसुली केली जाऊ नये, असे आदेशच शासनाने काढले. अलीकडेच या आदेशानुसार मुंब्रा वळण रस्त्यावरील टोलवसुली बंद करण्यात आली. खचलेल्या रस्त्याच्या दुरुस्तीचे काम सुरू असले तरीही वाहतूक आता सुरू झाली आहे. मात्र रस्ता पूर्ण दुरुस्त होईपर्यंत टोलवसुलीस बंदी घालण्यात आली आहे. मुंब्रा वळण रस्त्यापासून काही अंतरावर असलेल्या शीळ-कल्याण रस्त्याला मात्र हा नियम लागू होत नाही. शीळफाटय़ापासून डोंबिवली, कल्याणकडे जाणाऱ्या रस्त्यावर मोठाले खड्डे पडले आहेत. मुंबई, ठाणे शहरात महापालिकेच्या रस्त्यांवर पडलेले खड्डे आणि खासगीकरणातून करण्यात आलेल्या रस्त्यांवर पडलेले खड्डे यात काहीही फरक नाही, अशी अवस्था आहे.
शीळ-कल्याण रस्त्याचे काम केलेल्या ठेकेदाराचे शासनाशी बिनसले आणि त्याने मुदत संपताच टोलवसुली बंद केली. रस्त्यासाठी झालेला खर्च भरून निघाला नाही, असा ठेकेदाराचा आक्षेप आहे. यावरून महाराष्ट्र राज्य रस्ते विकास मंडळ आणि ठेकेदार यांच्यात कायदेशीर लढाई सुरू झाली आहे. टोल वसुलीसाठी रस्ते विकास मंडळाने निविदा काढून ठेकेदाराची नियुक्ती केली आहे. टोल वसुली करणाऱ्या ठेकेदाराचे रस्त्याच्या दुरुस्तीसाठी काही देणेघेणे नाही. परिणामी कोणी वाहनचालकाने टोलवसुली करणाऱ्या ठेकेदाराकडे खड्डय़ांबाबत विचारणा केल्यास तेथील कर्मचारी शिवीगाळ करतात किंवा अंगावर धावून जातात, अशा तक्रारी वाहनचालकांनी केल्या आहेत.
या संदर्भात महाराष्ट्र राज्य रस्ते विकास मंडळाच्या अधिकाऱ्यांकडे विचारणा केली असता, खड्डे भरण्याकरिता अलीकडेच निविदा मागविण्यात आल्याचे सांगण्यात आले. खड्डे पडूनही टोलवसुली सुरू कशी, या प्रश्नावर मात्र रस्ते विकास मंडळाच्या अधिकाऱ्यांकडे उत्तर नव्हते. हा निर्णय वरिष्ठ पातळीवर घेण्यात येतो, अशी माहिती देण्यात आली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 11, 2013 1:36 am

Web Title: toll tax collection on the kalyan shil phata highway road
Next Stories
1 जागतिक मानांकनात देशातील एकही शिक्षणसंस्था नाही!
2 सणासुदीला पामतेल गायब होण्याची चिन्हे
3 विसर्जनाच्या वेळी ५४ जणांना माशांचा चावा
Just Now!
X