गणेशोत्सवासाठी कोकणातील आपल्या गावी जाणाऱ्यांची संख्या मोठी असते, या पार्श्वभूमीवर काही दिवसांवरच आलेल्या गणेशोत्सवासाठी मुंबई-कोल्हापूर मार्गे कोकणात जाणाऱ्या वाहनांना ३० ऑगस्ट ते १२ सप्टेंबर २०१९ पर्यंत टोल माफ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांनी सोमवारी ही माहिती दिली.

एका बैठकीत त्यांनी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोकणा मार्गांच्या स्थितीचा आढावा घेतला. या बैठकीस उच्च व तंत्र शिक्षणमंत्री विनोद तावडे, शालेय शिक्षणमंत्री आशिष शेलार, गृहनिर्माण राज्यमंत्री रविंद्र वायकर, गृहराज्यमंत्री (ग्रामीण) दिपक केसरकर, आमदार वैभव नाईक, रस्ते विभागाचे सचिव अजित सगणे आदींसह संबंधित अधिकाऱ्याची उपस्थिती होती.

गणेशोत्सवासाठी मुंबई – कोल्हापूर मार्गे कोकणात जाणाऱ्यांची संख्या व यंदा कोकण व पश्चिम महाराष्ट्रातील अतिवृष्टीमुळे दयनीय झालेली रस्त्यांची अवस्था पाहता, नागिरकांना कोणताही त्रास होऊ नये म्हणून उपाययोजनांचा व रस्त्यांच्या कामांचा आढावा या बैठकीत घेण्यात आला. काही ठिकाणी रस्ते दुरूस्तीची सुरू असलेली कामे लवकरात लवकर संपवण्याचेही आदेश देण्यात आलेले आहे. मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्गांचेही काम जलदगतीने सुरू आहे.