आजही शालेय स्तरावर उद्योजकतेचे प्रशिक्षण देणारे अभ्यासक्रम राबविले जात नाहीत, हे ओळखून ‘मॅक्सेल फाऊंडेशन’ने शालेय विद्यार्थ्यांच्या सोयीचा असा ऐच्छिक स्वरूपाचा उद्योजकता उपक्रम तयार केला असून प्रारंभी निवडक २५ शाळांमध्ये प्रायोगिक स्वरूपात तो सुरू करण्याचे फाऊंडेशनने ठरविले आहे.

येत्या ७ मे रोजी या अभ्यासक्रमाची अधिकृत घोषणा होणार आहे. उद्योजकता हा पाठय़पुस्तकी अभ्यासक्रम नव्हे, तर अनुभवावर आणि प्रात्यक्षिकावर आधारित ज्ञानसंपादनाचा मार्ग असल्याने, विद्यार्थ्यांमध्ये त्याविषयी गोडी निर्माण करणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे. यासाठी विद्यार्थ्यांनीच आपल्या अनुभवाच्या नोंदी ठेवाव्यात, आपल्या नेमक्या आवडी स्वतच ओळखाव्यात व त्यानुसार आपल्या क्षमतांचा विकास घडवावा, पाठय़क्रमाच्या पलीकडे जाऊन जगाची ओळख करून घ्यावी, स्वतच्या आवडीचा स्वतंत्र विचार करावा यासाठी फाऊंडेशनचा ‘मॅक्स्प्लोअर उपक्रम’ या नावाने तयार केलेला हा अभ्यासक्रम शाळांना उपयुक्त ठरेल, असा दावा मॅक्सेल फाऊंडेशनचे नितीन पोतदार यांनी केला आहे.

पाठय़क्रम नाही, प्रशिक्षित शिक्षकही नाहीत, तरीही विद्यार्थ्यांनी स्वतची आकलनशक्ती वापरून स्वतच स्वतमधील उद्योजकतेचा शोध घ्यावा, याकरिता आठवी किंवा नववीच्या विद्यार्थ्यांनी स्वतच स्वतच्या उद्योजकतेसंबंधीची एक प्रकल्प पुस्तिका तयार करावी. त्यामध्ये आपल्या आवडीचे उद्योग, सेवाक्षेत्र निवडून, उद्योजकांच्या मुलाखती, उत्पादन प्रक्रिया, जगभरातील नावाजलेले ब्रँड, ट्रेड मार्क, उद्योगसमूह भरभराटीला आणणाऱ्या व्यक्ती इत्यादी माहिती गोळा करून त्या आधारे स्वतच्या स्वप्नातील उद्योगाचा आराखडा विद्यार्थ्यांनी तयार करावा. त्यानंतर या उपक्रमातील सहभागी शाळांमध्ये सहा ते आठ आठवडय़ांचे मार्गदर्शन वर्ग आयोजित केले जातील व संवादातून प्रकल्प आकारण्यासाठी मदत केली जाईल. या मार्गदर्शन वर्गात प्रत्येक विद्यार्थ्यांस एक मार्गदर्शन पुस्तिका मोफत दिली जाईल.  मुंबई विद्यापीठाच्या लाईफ-लाँग लर्निग अँड एक्स्टेन्शनच्या सहकार्याने हा उपक्रम चालविला जाणार आहे.