News Flash

विद्यार्थी पसंतीच्या ‘टॉप २०’मध्ये उपनगरांतील महाविद्यालये सर्वाधिक

विद्यार्थ्यांनी आता उपनगरातील महाविद्यालयांकडे आपला मोर्चा वळविला आहे.

यात १० हजारांहून अधिक अर्ज आलेल्या २० महाविद्यालयांमध्ये १४ महाविद्यालये ही उपनगरांतील आहेत.

एकेकाळी चर्चगेट किंवा दादर-माटुंगा अशा शहरी भागातील महाविद्यालयांमध्ये प्रवेशासाठी उत्सुक असणाऱ्या विद्यार्थ्यांनी आता उपनगरातील महाविद्यालयांकडे आपला मोर्चा वळविला आहे. कारण यंदा पदवी महाविद्यालयांमध्ये १० हजारांहून अधिक प्रवेश अर्ज आलेल्या ‘टॉप २०’ महाविद्यालयांमध्ये उपनगरांतील महाविद्यालये मोठय़ा संख्येने आहेत.
मुंबई विद्यापीठाशी संलग्नित ५७२ महाविद्यालयांमध्ये २०१५-१६ या शैक्षणिक वर्षांच्या विविध पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी इच्छुक विद्यार्थ्यांच्या अर्जाच्या आकडेवारीवरून ही माहिती समोर आली आहे. यात १० हजारांहून अधिक अर्ज आलेल्या २० महाविद्यालयांमध्ये १४ महाविद्यालये ही उपनगरांतील आहेत. यात सर्वाधिक अर्ज विद्याविहारच्या सोमय्या कला, विज्ञान, वाणिज्य या महाविद्यालयांसाठी आले आहेत. गेल्या वर्षीही या महाविद्यालयात प्रवेशासाठी इच्छुक असलेल्या विद्यार्थ्यांची संख्या सर्वाधिक होती. यंदा तर २९,००२ विद्यार्थ्यांनी या महाविद्यालयात प्रवेशासाठी अर्ज केले होते.
त्या खालोखाल विलेपार्ले येथील मिठीबाई महविद्यालयात विद्यार्थी प्रवेश घेण्यास इच्छुक होते. कारण तब्बल २१,८९९ विद्यार्थ्यांनी या महाविद्यालयात प्रवेश मिळावा म्हणून अर्ज केले. त्या खालोखाल म्हणजे २०,९७९ इतके अर्ज हे चर्चगेटच्या जयहिंद महाविद्यालयाकरिता आले आहेत. तर चर्चगेटच्या झेवियर्स महाविद्यालयात प्रवेश मिळविण्यासाठी १८,१८९ विद्यार्थ्यांनी प्रयत्न केले होते.
अमुक एका महाविद्यालयातच पारंपरिक बीकॉम, बीएससी किंवा बीएला प्रवेश हवा असा विद्यार्थ्यांचा आग्रह असे. परंतु आता झटपट रोजगार संधी मिळेल या अपेक्षेने विद्यार्थ्यांचा बीएमएम, बीएमएस, बीएससी-आयटी, बीबीए, बीएफए आदी स्वयंअर्थसहाय्यित अभ्यासक्रमांना प्रवेश घेण्याकडे विद्यार्थ्यांचा कल वाढला आहे. त्यातच या अभ्यासक्रमांच्या वाढीव तुकडय़ांना मान्यता देण्याचे धोरण असल्याने गेल्या काही वर्षांमध्ये या अभ्यासक्रमांच्या तुकडय़ांची पर्यायाने प्रवेश क्षमता लक्षणीय संख्येने वाढली आहे. या अभ्यासक्रमांच्या शोधात असलेल्या विद्यार्थ्यांमुळे उपनगरांतील महाविद्यालयांच्याही प्रवेश अर्जाच्या संख्येत वाढ झाली आहे.

१) सोमय्या , विद्याविहार – २९००२
२) मिठीबाई, विलेपार्ले – २१८९९
३) जयहिंदू, चर्चगेट – २०९७९
४) झेवियर्स, चर्चगेट – १८१८९
५) केसी, चर्चगेट – १७४८८
६) वझे-केळकर, मुलुंड – १६४८२
७) एचआर, चर्चगेट – १६४४५
८) भवन्स, अंधेरी – १५,३५४
९) एसआयईएस, सायन – १४६३९
१०) सोमय्या (कला-विज्ञान), विद्याविहार – १३४८९
११) ठाकुर, कांदिवली – १३४८०
१२) हिंदुजा, चर्चगेट – १३६४०
१३) जोशी-बेडेकर, ठाणे – १२९४१
१४) सोमय्या (विज्ञान-वाणिज्य), – १२४६७
१५) मुलुंड कॉलेज – १२३७३
१६) नॅशनल, वांद्रे – १२२७३
१७) सराफ, मालाड – १०८६७
१८) रुपारेल, माटुंगा – १०७४०
१९) पाटकर, गोरेगाव – १०७२१
२०) ठाकूर महाविद्यालय, विरार – १०५९६

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 28, 2015 1:39 am

Web Title: top 20 college in mumbai
Next Stories
1 ‘एशियाटिक सोसायटी’ सरकारी मदतीच्या प्रतीक्षेत
2 वीज मागणीबाबत रेल्वेला ‘दाभोळ’चा दिलासा
3 चतुरंग रंगसंमेलनात सूर-तालाची मेजवानी
Just Now!
X