News Flash

तारपोरवाला मत्स्यालयातील कासवांचा आकस्मिक मृत्यू

गेल्या दोन दशकांपासून मुंबईतील तारपोरवाला मत्स्यालयात असणाऱ्या दोन सागरी कासवांचा आकस्मिक मृत्यू झाला आहे.

 

मृत्यूबाबत गूढ कायम; मत्स्यालयात आता कासवाचे वास्तव्य नाही

गेल्या दोन दशकांपासून मुंबईतील तारपोरवाला मत्स्यालयात असणाऱ्या दोन सागरी कासवांचा आकस्मिक मृत्यू झाला आहे. तर उरलेल्या शेवटच्या कासवाची प्रकृतीदेखील गंभीर असल्याने त्याला डहाणू येथील कासव शुश्रूषा केंद्रामध्ये दाखल करण्यात आले आहे. मे महिन्यातील शेवटच्या आठवडय़ात दोन्ही कासवांचा अचानक मृत्यू झाल्याने त्यांच्या मृत्यूच्या कारणांबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. मुख्य म्हणजे दोन्हीं कासवांचा मृत्यू आणि एका कासवाला उपचारासाठी स्थलांतरित केल्यामुळे आता मत्स्यालयात एकाही सागरी कासवाचे वास्तव्य राहिले नाही.

वीस कोटी रुपये खर्चून नूतनीकरण करण्यात आलेल्या तारापोरवाला मत्स्यालयातील सर्वात जुन्या दोन समुद्री कासवांचा मृत्यू झाला आहे. हॉक्सबिल प्रजातीचे एक आणि ग्रीन सी प्रजातीचे दोन मादी कासवे मत्स्यालयात होती. गेल्या २५ वर्षांपासून मत्स्यालयात असलेले हॉक्सबिल प्रजातीचे कासव वर्षभरापासून कर्करोगाने ग्रस्त होते. दोन महिन्यापूर्वीच या कासवाच्या डोक्यावरील कर्करोगाच्या गाठीवर उपचार झाल्याने त्याच्या प्रकृतीत सुधारणा झाली होती. तसेच मत्स्यालयात शिरताच उजव्या बाजूच्या काचेच्या प्रदर्शनपेटीमध्ये विहार करणाऱ्या भल्यामोठय़ा ग्रीन सी कासवाच्या कवचावर संसर्ग झाला होता.

हॉक्सबिल प्रजातीच्या कासवाला असणारा कर्करोग पूर्णपणे बरा झाला होता. या कासवावर उपचार करणारे डॉ. दिनेश विन्हेकर आणि टाटा कर्करोग रुग्णालयाचे डॉ. चौधरी यांच्याकडून त्याची नियमित तपासणी केली जात होती. २० मे रोजी त्याची तपासणी केली असता त्याची प्रकृती उत्तम होती. मात्र, काही दिवसांनी त्याची प्रकृती ढासळून ३१ मे रोजी त्याचा मृत्यू झाला. तसेच ग्रीन सी कासवाची प्रकृतीदेखील खालावल्याने २४ मे रोजी त्याने आपले प्राण सोडले. यशस्वी उपाचारानंतर हॉक्सबिल प्रजातीच्या कासवाच्या प्रकृतीत सुधारणा होत असताना अचानक तिन्ही कासवे आजारी पडून दोन कासवांचा मृत्यू होणे धक्कादायक असल्याचे डॉ. दिनेश विन्हेकर यांनी सांगितले. तसेच गंभीर आजारी असणाऱ्या एकमेव ग्रीन सी कासवाची रवानगी उपचारासाठी डहाणूला केल्याचे त्यांनी सांगितले. या दोन्ही मृत कासवांचे शवविच्छेदन मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालयाचे डॉ. प्रशांत गाढवे यांनी केले होते. शवविच्छेदनाचे अहवाल मत्स्यालय प्रशासनाकडे सुपूर्द केले असल्याने त्यासंबंधीची माहिती प्रशासनाकडून घ्यावी, असे गाढवे यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले. तर कासवांच्या मृत्यूबाबात मत्स्यालयाचे अभिरक्षक अजिंक्य पाटील यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 12, 2018 3:31 am

Web Title: tortoise death in taraporewala aquarium
Next Stories
1 ‘द्रुतगती’वरील वेगमर्यादा कागदावर?
2 ‘म्हाडा’कडून पहिले निवासयोग्य प्रमाणपत्र जारी!
3 कल्याण गुन्हे शाखेतील पोलिसाकडून तरुणीचा विनयभंग
Just Now!
X