मुंबईतील एकूण करोनाबाधितांची संख्या तीन लाखांच्या पुढे गेली आहे. दैनंदिन रुग्णसंख्या कमी होत असली तरी आतापर्यंत एकूण तीन लाख मुंबईकरांना करोनाची बाधा होऊन गेल्याचे अधिकृत आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे. दरम्यान, मुंबईत बुधवारी ६७५ नवीन रुग्णांची नोंद झाली असून ८ रुग्णांचा मृत्यू झाला.

मुंबईतील करोनाची स्थिती नियंत्रणात असून रुग्ण वाढीचा सरासरी दर ०.२१ टक्क्यावर स्थिर आहे. तर रुग्ण दुपटीचा सरासरी कालावधी ३७१ दिवसांपर्यंत म्हणजे सुमारे एक वर्षांहून अधिक झाला आहे. दर दिवशी आढळणाऱ्या बाधितांमध्ये लक्षणेविरहित रुग्ण मोठय़ा संख्येने आढळू लागले आहेत. त्यामुळे गंभीर स्थितीतील रुग्णांची आणि पर्यायाने मृतांची संख्याही कमी झाली आहे.

मुंबईतील विविध रुग्णालयांमध्ये दाखल ५३१ रुग्ण बरे झाले असून त्यांना रुग्णालयातून घरी पाठविण्यात आले. त्यामुळे आतापर्यंत दोन लाख ८० हजारांहून अधिक म्हणजेच ९३ टक्के रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. गेल्या दोन दिवसांच्या तुलनेत बुधवारी दैनंदिन रुग्णसंख्येत वाढ झाली आहे.

मुंबईत दररोज सरासरी १५ हजार चाचण्या केल्या जात आहेत. त्यापैकी ५ टक्के अहवाल बाधित येत आहेत. सोमवारी १३ हजार चाचण्या करण्यात आल्या व त्यापैकी ५ टक्के अहवाल बाधित आले आहेत. आतापर्यंत २५ लाख ३३ हजारांहून अधिक चाचण्या करण्यात आल्या आहेत. एकूण चाचण्यांपैकी बाधित रुग्णांचे प्रमाण १२ टक्क्यांच्याही खाली गेले आहे.

स्थिती अशी..

बुधवारी ८ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली. त्यात ३ पुरुष आणि ५ महिलांचा समावेश होता. गेल्या नऊ  महिन्यांत करोनामुळे दगावलेल्यांची एकूण संख्या ११ हजार २१० वर पोहोचली आहे. उपचाराधीन रुग्णांपैकी सुमारे चार हजार रुग्णांना लक्षणे नाहीत, तर केवळ अडीच हजार रुग्णांना लक्षणे आहेत. साडेचारशे रुग्णांची प्रकृती गंभीर आहे.

राज्यात ३,५५६ नवे रुग्ण

मुंबई : राज्यात गेल्या २४ तासांत ३,५५६ करोनाबाधित आढळले, तर ७० जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे एकूण बाधितांची संख्या १९ लाख ७८ हजार, तर मृत्यूसंख्या ५० हजार २२१ इतकी झाली आहे. दिवसभरात पुणे शहर ३२८, नाशिक शहर १०६, पिंपरी-चिंचवड १५२, उर्वरित पुणे जिल्हा २०८, नागपूर ३११ रुग्ण आढळले.

ठाणे जिल्ह्य़ात ४१३ नवे रुग्ण

ठाणे : ठाणे जिल्ह्य़ात बुधवारी ४१३ करोनाबाधित आढळले, तर चार जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे एकूण बाधितांचा आकडा २ लाख ४८ हजार १७०, तर मृतांची संख्या ६ हजार ४२ झाली आहे.

बुधवारी ठाणे महापालिका क्षेत्रात १२१, कल्याण डोंबिवलीत ११३, नवी मुंबईत ८०, मीरा भाईंदर ३७, ठाणे ग्रामीण क्षेत्रात २५, बदलापूर १६, अंबरनाथ ११, उल्हासनगर पाच आणि भिवंडीतील पाच रुग्ण आढळले. मृतांमध्ये ठाण्यातील दोन, नवी मुंबई आणि मीरा भाईंदरमधील प्रत्येकी एका रुग्णाचा सामावेश आहे.