मुंबईतील पाच मतदारसंघांमध्येच काँग्रेस-राष्ट्रवादीला जास्त मते

लोकसभा निवडणुकीत मुंबईतील सर्व सहाही जागाजिंकून भाजप-शिवसेना युतीने आपले निर्विवाद वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध केले. आता राजकीय नेत्यांना विधानसभा निवडणुकीचे वेध लागले असून, लोकसभा निवडणुकीत ३१ मतदारसंघांमध्ये आघाडी मिळाल्याने युतीच्या अपेक्षा उंचावल्या आहेत. काँग्रेस आघाडीला शहरातील फक्त पाच मतदारसंघांमध्ये जास्त मते मिळावता आली.

मुंबईचा कौल हा साधारपणे एकाच पक्षाला किंवा आघाडीला मिळतो. यंदाही मुंबईचा कौल युतीला मिळाला आहे. लोकसभा निवडणुकीत ज्या पक्षाला किंवा आघाडीला यश मिळते त्यांनाच विधानसभेतही मुंबईत अधिक जागा किंवा यश मिळते, असा अनुभव आहे. गेल्या वेळी युतीने सर्व सहा जागा जिंकल्या होत्या. पण विधानसभा निवडणुकीत युती होऊ शकली नव्हती. तरीही भाजपने १५ तर शिवसेनेने १४ विधानसभा मतदारसंघांमध्ये विजय मिळविला होता. काँग्रेसचे पाच आमदार निवडून आले होते. समाजवादी पार्टी आणि एमआयएमचा प्रत्येकी एक आमदार निवडून आला होता. लोकसभा निवडणूक पार पडल्याने आता मुंबईत विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू झाली आहे.

लोकसभा निवडणुकीत मुंबईतील सहापैकी प्रत्येकी तीन जागा भाजप आणि शिवसेनेने लढविल्या होत्या. युतीला ३१ मतदारसंघांमध्ये आघाडी मिळाली. काँग्रेस व राष्ट्रवादीला फक्त पाच मतदारसंघांमध्ये आघाडी मिळाली. सहापैकी चार लोकसभा मतदारसंघांतील पाच विधानसभा मतदारसंघांमध्ये काँग्रेसला जास्त मते मिळाली आहेत. मुंबादेवी आणि भायखळा या दक्षिण मुंबईतील दोन विधानसभा मतदारसंघांत चांगली आघाडी मिळाली. या दोन्ही मतदारसंघांमध्ये विरोधी पक्षांचे आमदार आहेत. धारावी आणि मानखुर्द-शिवाजीनगर या विरोधकांच्या ताब्यातील मतदारसंघांमध्ये अधिक मते मिळाली आहेत. वांद्रे पूर्व या मतदारसंघात शिवसेनेच्या तृप्ती सावंत या आमदार असल्या तरी या मतदारसंघात काँग्रेसच्या प्रिया दत्त यांना १२७६ मतांची आघाडी मिळाली. याउलट काँग्रेसचे आमदार असलेल्या चांदिवली (नसिम खान) आणि मालाड पूर्व (आस्लम शेख) या दोन मतदारसंघांमध्ये भाजपला आघाडी मिळाली. वडाळा मतदारसंघातून काँग्रेसचे कालिदास कोळंबकर हे निवडून आले होते. पण सध्या ते भाजपबरोबर आहेत. या मतदारसंघात शिवसेनेच्या राहुल शेवाळे यांना मताधिक्य मिळाले आहे.

भाजप आणि शिवसेना</strong>

युतीच्या ताब्यातील विधानसभा मतदारसंघांत युतीचे फारसे नुकसान झालेले नाही. याउलट काँग्रसेच्या ताब्यातील विधानसभा मतदारसंघांमध्ये भाजपने आघाडी घेतली आहे.

या मतदारसंघांमध्ये काँग्रेस-राष्ट्रवादीला आघाडी

* दक्षिण मुंबई – मुंबादेवी आणि भायखळा

* दक्षिण मध्य मुंबई – धारावी

* ईशान्य मुंबई – मानखुर्द-शिवाजीनगर

* उत्तर मध्य – वांद्रे पूर्व