काँग्रेस दोन तर राष्ट्रवादी एक जागा लढणार ; शेकापची मदार अपक्षांवर

मुंबई : विधान परिषदेच्या ११ जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीत आघाडीतील जागावाटपानुसार काँग्रेस दोन तर राष्ट्रवादी एक जागा लढणार आहेत. ११व्या जागेसाठी चुरस असून, शेकापचे भाई जयंत पाटील हे अपक्षांच्या मदतीने हॅटट्रिक साधण्याच्या प्रयत्नात आहेत.

विधानसभेतील संख्याबळानुसार विरोधकांचे तीन उमेदवार निवडून येऊ शकतात. २०१६ मध्ये झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे दोन तर काँग्रेसचा एक उमेदवार निवडून आला होता. तेव्हाच दोन वर्षांने होणाऱ्या निवडणुकीत काँग्रेसला दोन जागांवर पाठिंबा देण्याचे राष्ट्रवादीने जाहीर केले होते. गेल्या वेळी ठरलेल्या जागावाटपानुसार काँग्रेसला दोन जागांवर पाठिंबा दिला जाईल, असे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले. राष्ट्रवादी एका जागेवर उमेदवार उभा करणार आहे.

काँग्रेसमध्ये कोणाला संधी?

काँग्रेसमध्ये दोन जागांसाठी प्रंचड स्पर्धा आहे. उपसभापती माणिकराव ठाकरे, पक्षाचे गटनेते शरद रणपिसे आणि संजय दत्त हे निवृत्त होत आहेत. तिघांचाही फेर उमेदवारीसाठी प्रयत्न आहे. राज्याचे प्रभारी मोहन प्रकाश यांना बदलण्यात आल्याने राजकीय समीकरणे बदलली आहेत. नवे प्रभारी मल्लिकार्जुन खरगे कोणती भूमिका घेतात हे सुद्धा महत्त्वाचे ठरणार आहे. रिपल्बिकन पक्ष गवई गटाचे राजेंद्र गवई यांनीही काँग्रेसकडे पाठिंब्याची अपेक्षा व्यक्त केली आहे. ठाकरे हे ज्येष्ठ सदस्य असून, रणपिसे हे दलित समाजातील आहेत. या दोघांना आणखी संधी द्यावी, असा पक्षात मतप्रवाह आहे. राज्यसभेसाठी ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर यांना उमेदवारी देऊन पक्षाने प्रस्थापितांना धक्का दिला होता. तसाच प्रकार पक्षाध्यक्ष राहुल गांधी करण्याची शक्यता नाकारता येत नाही. राज्यसभा हुकल्याने विधान परिषदेची उमेदवारी मिळावी, असा रजनी पाटील यांचा प्रयत्न आहे.

जयंत पाटील पुन्हा रिंगणात

११व्या जागेसाठी शेकापचे जयंत पाटील पुन्हा रिंगणात उतरणार आहेत. काँग्रेस व राष्ट्रवादीकडील अतिरिक्त मते आणि व अपक्षांच्या मदतीने आमदारकीची हॅटट्रिक साधण्याचा त्यांचा प्रयत्न आहे.

नागपूरमध्ये मतदान

विधान परिषदेची निवडणूक या वेळी प्रथमच मुंबईबाहेर होत आहे. निवडणूक काळात नागपूरमध्ये पावसाळी अधिवेशन होत आहे. त्यामुळे नागपूरला ही निवडणूक होईल, असे विधिमंडळाचे प्रधान सचिव डॉ. अनंत कळसे यांनी सांगितले.

 

’ राष्ट्रवादीचे चार सदस्य निवृत्त होत आहेत. यात माजी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांचा समावेश असला तरी ते विधान परिषद लढविणार नाहीत.

’ लोकसभा निवडणूक ते लढविणार आहेत. माथाडी कामगारांचे नेते व विद्यमान आमदार नरेंद्र पाटील यांचे तळ्यात-मळ्यात सुरू आहे. त्यांना भाजपने आमदारकीची साद घातली आहे.