पालिकेच्या ‘ड’ संवर्गातील पदांच्या लेखी परीक्षेचा कठीण अभ्यासक्रम; भारतीय घटनेपासून प्राचीन इतिहासाच्या विषयांचा अंतर्भाव

महापालिकेतील वरिष्ठ अधिकारी विविध विषयांत जितके पारंगत आहेत, तितकेच कनिष्ठ पातळीवरील कर्मचारीही ‘ज्ञानी’ असावेत, असा संकल्प मुंबई महापालिकेने यंदा सोडला आहे. त्यामुळेच की काय, श्रमिक, हमाल, स्मशान कामगार, आया या ड वर्गातील पदांसाठी राज्यभर होत असलेल्या ऑनलाइन परीक्षांसाठी जाहीर करण्यात आलेल्या अभ्यासक्रमात या विषयांचा समावेश करण्यात आला आहे. एवढेच नव्हे तर या पदांसाठी काम करण्याची इच्छा असणाऱ्यांना भारताचा प्राचीन व मध्ययुगीन इतिहास, राष्ट्रीय चळवळ, राजकारण, संविधान, व्यापार या विषयांसोबतच मराठी व्याकरण व इंग्रजी या विषयांचाही अभ्यास सुरू करावा लागेल.

आया पदासाठी अर्ज देणाऱ्या उमेदवारांना परिचारिका क्षेत्राविषयी फारशी माहिती नसली तरी हरकत नाही मात्र भारताचा व्यापार उदीम, आंतरराष्ट्रीय खेळ यासह संविधान, संसद आणि इंग्रजीतील वाक्प्रचार यांचा मात्र अभ्यास असावा, असे महानगरपालिका प्रशासनाला वाटत आहे. आपले कामगार सर्वगुणसंपन्न असावेत यासाठी महानगरपालिकेने ते निवडण्याच्या प्रक्रियेपासूनच तयारी केली आहे. त्यामुळे शाळेत बाजूला टाकलेल्या अनेक विषयांचा पुन्हा एकवार अभ्यास केल्यावरच पालिकेत हमाल, श्रमिक आणि आया म्हणून काम करता येईल.

महानगरपालिकेत ड संवर्गातील १३८८ पदांसाठी भरतीप्रक्रिया सुरू झाली आहे. यामध्ये कामगार, कक्षपरिचर, श्रमिक, हमाल, बहुउद्देशीय कामगार, स्मशान कामगार, आया इ. पदे आहेत. ११ डिसेंबर रोजी या भरतीसंदर्भातील जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली. त्याला प्रतिसाद देत या पदांसाठी राज्यभरातून तब्बल २ लाख ८७ हजार ०८८ उमेदवारांचे ऑनलाइन अर्ज आले आहेत. म्हणजेच एका पदासाठी सरासरी २०७ उमेदवारांमध्ये स्पर्धा असेल. २४ जानेवारीपासून सर्व उमेदवारांना ओळखपत्रही ऑनलाइन पद्धतीने पाठवले जाईल व १५ ते २५ फेब्रुवारी दरम्यान प्रमुख जिल्ह्यंत ऑनलाइन परीक्षा घेतली जाईल. या पदाच्या उमेदवारांसाठी प्रथमच लेखी परीक्षा घेतली जात असून या ऑनलाइन परीक्षेचा अभ्यासक्रम  पालिकेच्या संकेतस्थळावर देण्यात आला आहे. हा अभ्यासक्रम पाहता पालिकेत साफसफाई करण्याचे काम मिळवण्यासाठी उमेदवारांना चालू घडामोडींसोबतच राष्ट्रीय चळवळ आणि कोडिंग, डिकोडिंगचाही अभ्यास करणे आवश्यक आहे.

‘बदलत्या जगानुसार बदल’

दहावी उत्तीर्ण व्यक्तींनाच या पदांसाठी अर्ज करता येतो. या लेखी परीक्षेची काठिण्यपातळी सातवीपर्यंतच्या अभ्यासक्रमावर आधारलेली आहे. या परीक्षेत कोणत्याही प्रकारे शंकेस वाव राहू नये यासाठी त्रयस्थ संस्थेकडून परीक्षा घेण्यात येत आहे. या परीक्षेमध्ये ४० गुणांचे प्रश्न सोपे, ३० गुणांचे प्रश्न मध्यम स्वरूपाचे तर ३० गुणांचे प्रश्न थोडे कठीण स्वरुपाचे असतील व उत्तीर्ण होण्यासाठी ४० गुणांची आवश्यकता आहे, असे महापालिकेचे उपायुक्त सुधीर नाईक यांनी सांगितले. जग बदलत आहे, त्यानुसार परीक्षापद्धतीही बदलावी लागेल, असे ते म्हणाले.

ड संवर्गाच्या परीक्षेचा अभ्यासक्रम

* मराठी भाषा (४० गुण)

व्याकरण नियम, पर्यायी शब्द, शब्दाची रूपे आणि वाक्यरचना

* इंग्रजी भाषा (१० गुण)

वन वर्ड सब्स्टिटय़ुशन, स्पेलिंग एरर, इडिओम्स अ‍ॅण्ड फ्रेजेस

* सामान्य ज्ञान (२५ गुण)

भारतीय इतिहास – प्राचीन, मध्ययुगीन काळ, राष्ट्रीय चळवळ, भूगोल, राजकारण, संविधान व संसद, व्यापार, पर्यावरण, भारतीय संस्कृती, भारत व जगातील खेळ इ.

* अंकगणित आणि तर्कज्ञान (२५ गुण)

लसावि, मसावि, अपूर्णाक, टक्केवारी, नफा-तोटा, गुणोत्तर प्रमाण, व्याज, मिश्र व्यवहार गणित, भागीदारी, कोडिंग व डिकोडिंग, शब्दरचना, संबंध, संकल्पना, साम्य आणि भेद इत्यादी.