09 August 2020

News Flash

छोटय़ा भटकंतीला मोठी पसंती

पर्यटन व्यवसाय तेजीत, युरोपबरोबरच ऑस्ट्रेलियालाही पर्यटकांची वाढती मागणी

(संग्रहित छायाचित्र)

एकीकडे अनेक क्षेत्रांवर मंदीचे सावट असतानाही छोटय़ा कालावधीच्या पर्यटनाला अधिक पसंती मिळत आहे. मुख्यत: उन्हाळ्यातील देशाबाहेरील पर्यटनाला पर्यटकांचा चांगला प्रतिसाद मिळत असून १८ ते २५ दिवसांच्या मोठय़ा सुट्टीऐवजी १० ते १२ दिवसांच्या पर्यटनास प्राधान्य दिले जात आहे.

‘गेल्या दोन महिन्यांत मंदीसदृश वातावरण जाणवत होते, मात्र सध्या परदेशी सहलींच्या नोंदणीला चांगला प्रतिसाद मिळत आहे,’ असे केसरी टूर्सच्या संचालिका झेलम चौबळ यांनी सांगितले. युरोपातील नेहमीच्या पर्यटन ठिकाणापेक्षा क्रोएशिया, स्लोवाकिया या देशांमधील पर्यटनाकडे कल वाढत असल्याचे त्यांनी सांगितले. ‘नॉर्दन लाइट’सारखे अनोखे अनुभव घेण्याकडे पर्यटन अधिक वळतात.

सध्या उन्हाळ्यातील परदेशी पर्यटनासाठी नोंदणीचा काळ आहे. त्याबाबतच्या प्रतिसादात फारसा बदल झाला नसल्याचे ‘थॉमस कुक’चे राजीव काळे यांनी सांगितले. युरोप पर्यटनाच्या अनेक योजनांनाही चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे ते म्हणाले. त्याचबरोबर ऑस्ट्रेलिया आणि न्यूझिलंड या देशांकडून मिळणारे पॅकेजेस किफायतशीर असल्यामुळे, दिलेल्या पैशाचा योग्य मोबदला देणारे पर्यटनस्थळ म्हणून त्याकडे पर्यटकांचा कल वाढत आहे, असे काळे यांनी स्पष्ट केले.

मराठी पर्यटक ऑस्ट्रेलियाला प्राधान्य देत असून ऑस्ट्रेलिया पर्यटन मंडळाच्या आकडेवारीनुसार त्या देशात येणाऱ्या पर्यटकांमध्ये महाराष्ट्राचा पहिला नंबर आहे. जून २०१८ ते जून २०१९ या काळात राज्यातून ६८ हजार २०० पर्यटक ऑस्ट्रेलियात भटकंतीसाठी गेले. मागील वर्षांपेक्षा ही वाढ २१ टक्के अधिक असल्याचे ऑस्ट्रेलिया पर्यटन मंडळाचे व्यवस्थापक निशांत काशीकर यांनी सांगितले. ऑस्ट्रेलियात येणाऱ्या भारतीय पर्यटकांमध्ये महाराष्ट्रातील पर्यटकांचे प्रमाण २० टक्के आहे. तेथे ९० हजार भारतीय विद्यार्थी शिकत आहेत. तसेच व्हिसासाठी ऑनलाइन अर्ज करण्याच्या सुविधेचा फायदा होत आहे, असे काशीकर यांनी स्पष्ट केले.

‘जेट’चा फटका अजूनही..

‘जेट एअरवेज’ची सेवा बंद झाल्यानंतर बसलेल्या फटक्यातून पर्यटन व्यावसायिक अजून पूर्णपण सावरलेले नाहीत. ‘जेट’ बंद झाल्यानंतर अनेक मार्गावरील सोयीच्या वेळी असलेल्या वाहतूक सुविधेची उणीव इतर कंपन्यांमुळे भरून निघाली नसल्याचे पर्यटन व्यावसायिकांनी सांगितले. जेट नसल्यामुळे योग्य स्पर्धेअभावी वाजवी भाव मिळत नाही, तर तुलनेने कमी दर्जाच्या सेवेसाठी अधिक पैसे मोजावे लागत असल्याचे पर्यटन व्यावसायिकाचे म्हणणे आहे.

परदेशी पर्यटकांचा टक्का वाढला

केंद्रीय पर्यटन मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार ऑक्टोबरमध्ये भारतात आलेल्या परदेशी पर्यटकांच्या संख्येत ६.१ टक्के वाढ झाल्याचे दिसते. तर जानेवारी ते ऑक्टोबर या काळातील परदेशी पर्यटकांमध्ये २.७ टक्क्य़ांची वाढ झाली आहे.

काश्मीरमध्ये ७० टक्के घट

पुलवामा, सार्वत्रिक निवडणुका, ३७० कलम रद्द करण्याच्या पाश्र्वभूमीवर या वर्षी काश्मीरमधील पर्यटनात ७० टक्क्यांनी घट झाल्याचे झेलम चौबळ यांनी सांगितले. दिवाळीत थोडय़ा कालावधीसाठी काश्मीरमध्ये पर्यटन हंगाम असतो, त्यालाही फारसा प्रतिसाद मिळाला नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

* वर्षांतून एकच मोठी सुट्टी घेण्यापेक्षा दोन ते तीन छोटय़ा सुट्टय़ा घेऊन पर्यटनास जाण्याचा कल वाढत आहे.

– झेलम चौबळ, केसरी टूर्स

* भारतापासून जवळ असलेल्या भूतान, बाली, सिंगापूर या देशांतील पर्यटनास पर्यटकांची पसंती आहे.

– राजीव काळे, थॉमस कुक

* मराठी पर्यटकांचा ओढा ऑस्ट्रेलियाकडे आहे. भारतीयांची  तेथील वाढती संख्या यामुळेही पर्यटनात वाढ झाली आहे.

– निशांत काशीकर, व्यवस्थापक, ऑस्ट्रेलिया पर्यटनमंडळ

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 9, 2019 12:47 am

Web Title: tourism business good in recession abn 97
Next Stories
1 थंडीची चाहूल
2 राज्याची केंद्राकडे ७ हजार २८ कोटींची मागणी
3 मध्य आणि हार्बर मार्गावर ब्लॉक नाही, पण …
Just Now!
X