महाराष्ट्रात मोठे पर्यटन वैभव आहे. महाराष्ट्राचा हा ठेवा जगासमोर आला पाहिजे. पर्यटन विभाग व एमटीडीसी यासाठी व्यापक प्रयत्न करत असून राज्यातील पर्यटन जगभरात पोहोचवून तेथील पर्यटकांना महाराष्ट्राकडे आकर्षित केले जाईल, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

भंडारा, गोंदिया जिल्ह्य़ातील नागझिरा अभयारण्यातील पक्षी व निसर्ग चित्रे मुंबई-पुणे डेक्कन क्वीन एक्स्प्रेसवर लावण्यात आली. शनिवारी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून ठाकरे यांच्या हस्ते या उपक्रमाचे हिरवा झेंडा दाखवून उद्घाटन करण्यात आले. विविध रेल्वे गाडय़ांवर अशाच प्रकारे महाराष्ट्रातील पर्यटनस्थळांची प्रसिद्धी करून  पर्यटकांना महाराष्ट्राकडे आकर्षित करू, असेही त्यांनी सांगितले. डेक्कन क्वीनवर नागझिरा अभयारण्यातील पक्षी व निसर्गचित्रांसह एमटीडीसीच्या बोधलकासा पर्यटक निवासाची चित्रे झळकविण्यात आली. एमटीडीसीचे व्यवस्थापकीय संचालक अभिमन्यू काळे यांच्या संकल्पनेतून आणि पर्यटन विभागाच्या प्रधान सचिव विनीता सिंघल यांच्या पुढाकारातून हा उपक्रम आकाराला आला. महाराष्ट्रातील गडकिल्ले, समुद्रकि नारे, अभयारण्ये, थंड हवेची ठिकाणे तसेच मेडिकल टुरिझमचा विस्तार करण्याबरोबरच प्रसिद्धी करून पर्यटकांना आकर्षित करण्याच्या  योजना राबविण्यात येतील, असे विनीता सिंघल यांनी सांगितले.