सहलीसाठी मुरुड येथे गेलेल्या चेंबूरच्या सहा बांधकाम व्यावसायिकांवर काळाने घाला घातला आह़े  या घटनेमुळे हे सहा जण राहात असलेल्या घाटला भागात शोककळा पसरली आह़े  घरातील कर्ता पुरुष गमाविल्यामुळे त्यांचे कुटुंबिय तर प्रचंड हादरून गेले आहेत़
उन्हाळय़ात घरांच्या दुरुस्तीची-बांधकामाची छोटी-मोठी कामे झाल्यावर जुलैमध्ये श्रमपरिहारासाठी जायचे हा या छोटय़ा बांधकाम व्यावसायिकांचा दरवर्षीचाच शिरस्ता होता़  यावर्षीही ‘वज्रमूठ’ या संस्थेमार्फत हे सुमारे १७ बांधकाम व्यावसायिक मुरुड येथे गेले. मात्र त्यातील सहा जण आता कधीही परतून येऊ शकणार नाहीत़  मुरुड येथील या दुर्घटनेचे वृत्त समजताच घाटल्यातील नाक्यानाक्यावर या सहलीची चर्चा सुरू झाली. त्यातील काही जण शिवसैनिक होत़े  त्यामुळे काही स्थानिक शिवसैनिकांनी मुरुडला तर काहींनी अलिबागच्या रुग्णालयात धाव घेतली.
बैठी घरे, चाळी, झोपडय़ांनी घाटल्यातील बराचसा भाग व्यापला आहे. मुलांच्या परीक्षा आटोपल्यानंतर या परिसरातील घरांची मोठय़ा प्रमाणावर डागडुजीची कामे केली जातात. बैठय़ा घरांवर मजले चढविण्याचे कामही एप्रिल-मे दरम्यानच केले जाते. त्यामुळे छोटय़ा बांधकाम व्यावसायिकांची या काळात चलती असते. जुलैमध्ये कामे आटोपल्यानंतर ‘वज्रमूठ’ संघटनेतर्फे दरवर्षी या व्यावसायिकांच्या सहलीचे आयोजन केले जाते. यंदा त्यांची सहल मुरुड येथे गेली होती़  परंतु, मुरुडमध्ये सहलीचा आनंद घेत असतानाच अनर्थ ओढावला़  ही बातमी घाटल्यात पोहोचताच, आपला मुलगा, पती, वडील सुखरूप आहेत का, याची चौकशी सुरू झाली.
त्यानंतर काही वेळातच बुडालेल्यांची नावे कळली़ पोहायला उतरलेल्या रोहित जाला, दिलीप गोळे, संजय पांचाळ, विनोद अजयी, दिनेश पवार आणि शंकर चव्हाण यांचा मृत्यू झाल्याचे कळले आणि  त्यांच्या कुटुंबियांचा धीरच खचला़  हे सहाही जण घराबाहेर पडले, तेव्हा दरवर्षीप्रमाणेच सहलीला जात आहेत़  ठरल्यावेळी परत येतील असेच सर्वाना वाटले होते. पण आता ते कधीच परतणार नाहीत..