News Flash

‘जेट’ जमिनीवर आल्याने पर्यटकांच्या सहलयोजना अधांतरी!

पर्यटन उद्योगांचीही पर्यायी व्यवस्थेसाठी कसरत

पर्यटन उद्योगांचीही पर्यायी व्यवस्थेसाठी कसरत, कोटय़वधींचे आरक्षण अडचणीत

रेश्मा राईकवार, मुंबई

जेट एअरवेजची सेवा अनिश्चित काळासाठी ठप्प झाल्याने या सेवेची आरक्षणे केलेल्या पर्यटकांच्या सहलींचे नियोजनही अधांतरी भिरभिरत आहे. उन्हाळी सुटय़ांसाठी केलेल्या विमान तिकिटांच्या आरक्षणाचे कोटय़वधी रुपये जेटकडे अडकून पडल्याने पर्यटन उद्योजकही हबकले असले तरी पर्यटकांची पर्यायी व्यवस्था करण्याची त्यांची कसरतही जोमाने सुरू आहे.

जेट एअरवेजसारख्या मोठय़ा कंपनीच्या बाबतीत जे घडले ते दुर्दैवी आहे, मात्र अशावेळी घाबरून न जाता पर्यटन कंपन्या आणि पर्यटक यांनी परस्पर सामंजस्याने मार्ग काढणे गरजेचे असल्याचे मत ‘वीणा वर्ल्ड’च्या वीणा पाटील यांनी व्यक्त केले. ज्यांनी वैयक्तिक आरक्षण केले होती त्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. सहल रद्द केली किंवा अधिकचे पैसे मोजत दुसऱ्या हवाई कंपन्यांकडून तिकीट घेऊन सहल पूर्ण केली तर निदान हॉटेल आरक्षणासह अन्य नुकसान वाचवता येईल, याचाही ग्राहकांनी विचार करावा, असे मत त्यांनी व्यक्त केले.  ‘वीणा वर्ल्ड’च्या देशांतर्गत सहलींमध्ये हिमाचल प्रदेश येथील सहलींचे आरक्षण जेटकडे होते. त्या सहली आणि भूतान, नेपाळ सहली अन्य हवाई कंपन्यांच्या मदतीने होत आहेत. तर आंतरराष्ट्रीय सहलीही कमी दरात जो हवाई मार्ग उपलब्ध होईल त्यानुसार पूर्ण करण्यात येत आहेत, अशी माहिती वीणा पाटील यांनी दिली.

‘जेट’च्या सेवा रद्द झाल्याने अन्य  कंपन्यांनी तिकीट दर वाढ केली आहे. येत्या दहा दिवसांत देशांतर्गत तिकीट दरांत  ३०-३५ टक्के, तर आंतरराष्ट्रीय तिकीटदरांमध्ये २५ ते ३० टक्क्यांनी वाढ झाल्याची माहिती ‘कॉक्स अँड किंग्ज’चे व्यवसायप्रमुख जॉन नायर यांनी दिली. मेच्या दुसऱ्या आठवडय़ानंतर हे दर कमी होतील आणि पर्यटकांना दिलासा मिळू शकेल, असे ते म्हणाले. मात्र ही वाढ इतक्या लवकर कमी होणे शक्य नसल्याचे मत ‘केसरी टूर्स’चे शैलैश पाटील यांनी व्यक्त केले.

मोठय़ा सुटीचा काळ लक्षात घेत जेट एअरवेजचे आरक्षण ज्यांनी केले होते त्यांना त्यांचे पूर्ण पैसे आम्ही परत देत आहोत. पर्यटकांना त्यांचे बेत रद्द करण्याची वेळ येऊ  नये यासाठी अन्य हवाई कंपन्यांची तिकिटेही आरक्षित करून देत आहोत, असे ‘कॉक्स अँड किंग्ज’चे रिलेशनशिप हेड करण आनंद यांनी सांगितले. ‘जेट’ने ग्राहकांना परतावा देणार असल्याचे सांगितले आहे. तिकीट ‘एजंट’ या नात्याने त्यांच्या संपर्कात राहून पैसे परत येताच ते ग्राहकांना देण्यात येतील. ‘जेट’च्या प्रवाशांसाठी खास कक्ष, हेल्पलाइन क्रमांकही देण्यात आला असल्याची माहिती ‘मेक माय ट्रिप’च्या प्रवक्त्यांनी दिली.

कोटय़वधी रुपये अडकले

जेटला ग्राहकांची सर्वाधिक पसंती असल्याने आमची बुकिंग्ज तिथे जास्त आहेत. आमची ४ कोटींपेक्षा जास्त रक्कम बुकिंगमध्ये अडकली आहे. हवाई कंपनी उड्डाण रद्द करत नाही तोवर ग्राहकांना परतावा मिळत नाही. त्यामुळे धोका जाणवत असूनही एजन्सीज्ना आरक्षण रद्द करता आले नाही. याप्रकरणी सरकार काही हस्तक्षेप करून ग्राहकांना आणि एजन्सीज्ना मदत देऊ शकेल, अशी अपेक्षा आहे. मात्र तेही निवडणूक प्रक्रियेत अडकले असल्याने यावर मार्ग काढण्यासाठी मेच्या दुसऱ्या-तिसऱ्या आठवडय़ापर्यंत वाट पाहावी लागणार असल्याचे वीणा पाटील यांनी सांगितले.

‘जेट’कडे १२० विमाने होती. दिवसाला ७०० उड्डाणे आणि जवळपास दहा लाख पर्यटक प्रवास करत होते. आता सगळ्या हवाई कंपन्या मिळून १० लाख पर्यटक प्रवास करतील एवढीच क्षमता आहे. मागणी आणि पुरवठा यातील तफावतीमुळे लंडनचे इकॉनॉमी वर्गाचे तिकीट एक लाख रुपयांच्या वर गेले आहे, तर नेपाळचे फक्त जाण्याचे तिकीट ४० हजार रुपयांपर्यंत वाढले आहे.

‘केसरी टूर्स’चे पर्यायी नियोजन..

‘केसरी टूर्स’च्या सगळ्या सहली नियोजनानुसार अन्य हवाई कंपन्यांची तिकिटे आरक्षित करून पूर्ण करण्यात येत आहेत, असे ‘केसरी टूर्स’चे शैलेश पाटील यांनी सांगितले. ही आणीबाणीची परिस्थिती आहे, अशावेळी ग्राहकांना आम्ही नवीन आरक्षणे करून देत आहोत, केवळ नव्या दरातील अधिकचा भार त्यांना उचलण्याची विनंती करत आहोत. ग्राहकांनाही परिस्थितीची जाणीव असल्याने ते सहकार्य करत आहेत, असे शैलेश पाटील यांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 20, 2019 2:30 am

Web Title: tourist face problem after jet airways stop operation
Next Stories
1 मोदी यांनी करकरेंच्या घरी धाव घेतली होती..
2 काँग्रेसच्या प्रवक्त्या प्रियंका चतुर्वेदी शिवसेनेत
3 सुक्या कचऱ्याच्या विल्हेवाटीतून कचरावेचकांच्या उन्नतीचा मार्ग
Just Now!
X