News Flash

दर्शनासाठी गेलेल्यांना ‘विश्वरूप दर्शन’

चारधाम यात्रा करून पुण्य पदरात बांधून घेण्यासाठी ते उत्तरेत गेले.. विविध यात्रा कंपन्यांसह गेलेल्या त्या सगळ्यांना देवदर्शनाऐवजी ‘विश्वरूप दर्शन’ मात्र घडले.. निसर्गाच्या तांडवापुढे हे सर्वच

| June 19, 2013 03:28 am

चारधाम यात्रा करून पुण्य पदरात बांधून घेण्यासाठी ते उत्तरेत गेले.. विविध यात्रा कंपन्यांसह गेलेल्या त्या सगळ्यांना देवदर्शनाऐवजी ‘विश्वरूप दर्शन’ मात्र घडले.. निसर्गाच्या तांडवापुढे हे सर्वच हतबल झाले.. कोणाशीही संपर्क नाही.. रस्ता खचून गेलेला.. ही परिस्थिती आहे विविध यात्रा कंपन्यांसह उत्तराखंड, उत्तर काशी, चारधाम या ठिकाणी पर्यटनाला गेलेल्या मुंबईकरांची! सध्या उत्तरेत सुरू असलेल्या पावसाच्या तांडवामुळे ३०० मुंबईकर अडकून पडले आहेत. मात्र हे सर्व पर्यटक सुखरूप असल्याचा दावा यात्रा कंपन्यांनी केला आहे.
दरवर्षी मे महिन्याच्या अखेरीस अनेक यात्रा कंपन्यांमार्फत चारधाम यात्रेसाठी मुंबईतून पर्यटक जातात. यंदा मात्र मान्सूनचे आगमन अपेक्षेपेक्षा खूपच आधी झाले. मान्सून उत्तरेत जोमाने दाखल झाला आणि त्याने हाहाकार उडवून दिला. उत्तरकाशी येथील एक इमारत अक्षरश: पत्त्याच्या बंगल्यासारखी कोसळताना सगळ्यांनी पाहिली. हे सर्व पर्यटक सुरक्षित असल्याचा निर्वाळा या यात्रा कंपन्यांच्या मुंबईतील कार्यालयांनी दिला आहे.
कॉक्स अ‍ॅण्ड किंग्ज टूर्सचे संपर्क अधिकारी थॉमस यांनी सांगितले की, उत्तर काशीजवळील कुंड आणि हर्षिल या दोन गावांमधील झाला या छोटय़ा गावात १० जणांचा एक गट अडकला आहे. स्थानिक रहिवाशांची घरे भाडय़ाने घेऊन त्यांची व्यवस्था करण्यात आली असून ते सुखरूप आहेत.  या गटामध्ये दोन ज्येष्ठ महिला आहेत. झाला गावाजवळचा मुख्य रस्ता पूर्णत: वाहून गेला असल्याने सध्या या पर्यटकांना कुठेही हलवणे शक्य नाही.

पर्यटकांच्या मदतीला राज्य सरकारचा हात
उत्तराखंडमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातील पर्यटकांच्या सुटकेसाठी राज्य सरकारने हात पुढे केला आहे. अशा सर्वच लोकांना राज्य सरकारमार्फत तातडीने सर्व ती मदत देण्याचे आदेश मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मंगळवारी दिले. दिल्ली येथील महाराष्ट्र सदनातील अतिरिक्त निवासी आयुक्त प्रदीप कुमार यांच्या अधिपत्याखाली एक पथक घटनास्थळी पाठवण्यात आले असून ते डेहराडून येथे पोहोचले आहे. डेहराडून येथे राज्य सरकारतर्फे कार्यालय सुरू करण्यात येणार असून तेथे महाराष्ट्रातील प्रवाशांना आवश्यक सामुग्री आणि वाहन व्यवस्था करण्यात आल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. तसेच महाराष्ट्रातून उत्तराखंडात गेलेल्या यात्रेकरूंची माहिती गोळा करण्यासाठी राज्यातील सर्व जिल्हाधिकारी, परिवहन आयुक्त यांना आदेश देण्यात आले आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 19, 2013 3:28 am

Web Title: tourist saw vishwa darshan
Next Stories
1 मध्य रेल्वेचे पहिले पाढे पंचावन्न!
2 कोटय़धीश कार्यालयाला वाहनतळच नाही
3 दीड हजाराच्या मोबाईलपायी दोन चोरांनी गमावला प्राण
Just Now!
X