08 March 2021

News Flash

‘टोचन’पायी गाडय़ांचे ‘शोषण’ थांबणार!

वाहतूक पोलीसही महागडय़ा गाडय़ा ‘टो’ करण्याचे टाळत होत्या.

अडथळा ठरणाऱ्या गाडय़ा अलगद उचलण्यासाठी सप्टेंबरपासून अत्याधुनिक क्रेन

दुचाकी असो की चारचाकी, मुंबईत गाडी कुठेही उभी केल्यानंतर ती वाहतूक पोलिसांकडून उचलली जाण्यापेक्षा चालकांना धास्ती असते ती गाडी उचलताना होणाऱ्या नुकसानाची. पण आता गाडय़ांचे ‘टोचन’ कालबाह्य़ होणार आहे. सप्टेंबरपासून शहरात गाडय़ा उचलण्यासाठी हायड्रॉलिक क्रेनचा वापर करण्यात येणार असून त्यामुळे गाडीवर ओरखडाही न उठता ती अलगद उचलता येणे शक्य होणार आहे. या प्रत्येक क्रेनवर सीसीटीव्ही कॅमेरेही असणार आहेत. त्यामुळे गाडी उचलताना चित्रीकरण करण्यात येणार असल्याने कारवाईतील पारदर्शकताही वाढण्यास मदत होणार आहे.

नो-पार्किंगच्या परिसरात, तसेच वाहतुकीला अडथळा निर्माण करणाऱ्या ठिकाणी नागरिकांनी गाडी उभी केल्यानंतर मुंबई वाहतूक पोलिसांकडून त्या गाडय़ा उचलण्यात येतात. मात्र, टोइंग गाडय़ांवर ठेवण्यात आलेल्या  कंत्राटदारांच्या मुलांच्या धसमुसळ्या कारभाराविषयी नागरिकांमध्ये प्रचंड नाराजी होती. गाडी उचलताना गाडीवर ओरखडा उठणे, बोनेट तुटणे, काचेचे नुकसान असे प्रकार घडत असल्याने ‘टोइंग’बद्दल वाहनचालकांत रोष होता. वाहतूक पोलीसही महागडय़ा गाडय़ा ‘टो’ करण्याचे टाळत होत्या. या पाश्र्वभूमीवर गाडय़ा अलगद उचलणाऱ्या अत्याधुनिक प्रकारच्या टोइंग गाडय़ा आणण्याचा निर्णय मुंबई वाहतूक पोलिसांनी घेतला. नव्या पद्धतीच्या टोइंग गाडय़ा म्हणून हायड्रॉलिक क्रेन वापरण्यात येणार असून यांत्रिक पद्धतीनेच उचलण्यात येणार आहे. त्यामुळे गाडय़ांना नुकसान होण्याचे प्रकारही पूर्णपणे थांबणार आहेत. सप्टेंबरपासून टप्प्याटप्प्याने शहरात या क्रेन उपलब्ध होणार असून दुचाकींसाठी ४० तर चारचाकींसाठी ४० क्रेन कार्यरत राहणार आहेत.

  • हलक्या नॅनो गाडय़ांपासून अवजड ऑडी, मर्सिडिज, बीएमडब्ल्यू गाडय़ा उचलणे शक्य होणार
  • गाडय़ा टो केल्यानंतर त्याची माहिती तातडीने वाहतूक मुख्यालयात कळविण्यात येणार
  • क्रेनवर असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमुळे गाडी कुठून उचलली, का उचलली, त्याला नुकसान झाले का याचे चित्रीकरण राहणार

गाडय़ांचे टोइंग करताना त्यांना नुकसान होण्याच्या घटना वारंवार घडत असत. तसेच अवजड, विदेशी बनावटीच्या गाडय़ा उचलणे जुन्या टोइंग गाडय़ांना शक्य होत नव्हते. अशा गाडय़ांमुळे वाहतुकीला अडथळा होण्याचे प्रमाणही लक्षणीय होते. नव्या हायड्रॉलिक क्रेनमुळे साध्या गाडय़ांपासून अवजड गाडय़ाही सहजपणे उचलता येणे शक्य होणार आहे.

– मिलिंद भारंबे, पोलीस सहआयुक्त (वाहतूक)

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 27, 2016 2:09 am

Web Title: towing van issue mumbai police
Next Stories
1 लाभदायी गुंतवणुकीची गुरुकिल्ली
2 अग्निशमन दलात यंत्रसामग्री खरेदीत घोटाळा?
3 ‘महाराष्ट्र मेडिकल काऊन्सिल’ बरखास्त
Just Now!
X