नगरसेविकेच्या मागणीला पालिका प्रशासनाचा सकारात्मक प्रतिसाद

मुंबई : पालिकेच्या रुग्णालयांत उपचार घेण्यासाठी येणाऱ्या लहान मुलांसाठी येत्या काळात खेळण्याची खोली तयार करण्याचा पालिका प्रशासनाचा विचार करीत आहे. ज्या रुग्णालयात जागा उपलब्ध आहे अशा ठिकाणी खेळण्याची खोली तयार करण्यात येणार आहे. आजाराने त्रासलेली मुले आणि त्यांचे पिचलेले पालक यांच्यासाठी अशी खोली खूप उपयुक्त ठरणार आहे.

पालिकेच्या रुग्णालयांत मुंबईबरोबरच देशाच्या कानाकोपऱ्यांतून उपचार घेण्यासाठी लहान मुले येतात. रुग्णालयात बराच काळ उपचारांसाठी राहणे त्यांच्यासाठी फारच कंटाळवाणे ठरते. काही वेळा तर या मुलांवरील उपचार काही महिने सुरू असतात. रुग्णालयात करमणुकीची साधने नसल्यामुळे मुले सारखी चिडचिड करत राहतात. उपचारादरम्यान डॉक्टरांना व पालकांनाही खूप त्रास देतात. त्यामुळे पालिकेच्या रुग्णालयांत लहान मुलांना खेळण्यासाठी एक विशेष खोली तयार करावी, अशी मागणी राष्ट्रवादीच्या नगरसेविका डॉ. सईदा खान यांनी केली होती.

या मागणीला प्रशासनाने सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. रुग्णालयातील जागेच्या उपलब्धतेनुसार अशी खोली तयार करून लहान मुलांना विरंगुळा करण्यासाठी साहित्य उपलब्ध करून दिले जाईल. पालिकेच्या १६ उपनगरीय रुग्णालयांपैकी १५ रुग्णालयांत बालरुग्ण विभाग आहे. त्या विभागाच्या भिंती विविध रंगांनी, चित्रांनी रंगवल्या आहेत. तसेच मुलांना काही खेळणीही उपलब्ध करून दिली जातात. मात्र आता या रुग्णालयात वेगळी खोली सुरू केली जाण्याची शक्यता आहे. तसेच पालिकेच्या तीन प्रमुख तसेच इतर विशेष रुग्णालयांतही अशा प्रकारच्या खोल्या तयार केल्या जाऊ  शकतील, असे प्रशासनाने म्हटले आहे.

खोलीचे स्वरूप

या खोलीमध्ये कॅरम, चेंडू, डोलणारे प्राणी, गाडय़ा, सायकल आदी विविध प्रकारची खेळणी उपलब्ध करण्यात यावीत, तसेच खेळण्याबरोबरच बालवाडी व पहिलीच्या मुलांकरिता इंग्रजी व मराठी बाराखडी, आकडेवारी पक्षी, प्राणी, फळे व फुलांच्या चित्रांसहित उपलब्ध करून त्याचे मोठमोठे स्टीकर भिंतीवर लावण्यात यावेत, अशा सूचना डॉ. खान यांनी केल्या आहेत.