पालघर आणि नाशिक जिल्ह्य़ातील शासकीय आश्रमशाळेतील मुलांना आता गरमागरम सकस आणि आरोग्यदायी जेवण मिळणार आहे. ज्येष्ठ उद्योगपती रतन टाटा यांच्या पुढाकारातून या दोन्ही जिल्ह्य़ांत मध्यवर्ती अत्याधुनिक स्वयंपाकगृह उभारण्यात येणार असून बंद डब्यातून विद्यार्थ्यांपर्यंत काही वेळातच जेवण पोहोचविले जाणार आहे.
आदिवासी विकास विभागाच्या अंतर्गत असलेल्या या आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना सकस आणि आरोग्यदायी आहार मिळावा यासाठी पालघर जिल्ह्य़ातील कांबळगाव आणि नाशिक जिल्ह्य़ातील मुंढेगाव येथे प्रायोगिक तत्त्वावर मध्यवर्ती स्वयंपाकगृह उभारण्यात येणार आहेत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आदिवासी विकासमंत्री विष्णू सावरा, ज्येष्ठ उद्योगपती रतन टाटा यांच्या उपस्थितीत आदिवासी विकास विभाग, टाटा ट्रस्ट आणि अक्षयपात्र फाऊंडेशन यांच्यात मध्यवर्ती स्वयंपाकगृह योजनेबाबतचा सामंजस्य करार करण्यात आला आहे.
आश्रमशाळा तसेच वसतिगृहातील विद्यार्थ्यांना नाश्ता, दुपारचे जेवण तसेच रात्रीचे जेवण देण्यासाठी एकच मध्यवर्ती स्वयंपाकगृह उभारून तेथे जेवण तयार करणे, तयार झालेले जेवण वाहनांद्वारे संबंधित आश्रमशाळा, वसतिगृह येथे पोहोचवून त्याचे विद्यार्थ्यांना वाटप करणे अशी ही योजना असल्याचे आदिवासी विकास विभागाचे सचिव राजगोपाल देवरा यांनी प्रकल्पाचे सादरीकरण करताना सांगितले.
त्यावर बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी, प्रायोगिक तत्त्वावर दोन जिल्ह्य़ांत राबविण्यात येणारा हा उपक्रम लवकरच राज्यातील सर्वच आश्रमशाळांमध्ये राबवावा आणि आदिवासी भागामध्येसुद्धा ही योजना राबवावी, त्यामुळे मुलांना सकस आहार मिळेल, अशी सूचना आदिवासी विभागास केली.
या योजनेतून पालघर जिल्ह्य़ातील कांबळगाव येथील मध्यवर्ती स्वयंपाकगृहातून पालघर व डहाणू तालुक्यातील ४० किलोमीटर परिसरातील १२ आश्रमशाळा तसेच नऊ वसतिगृहांमधील जवळपास १२ हजार विद्यार्थ्यांना गरमागरम जेवण पुरविण्यात येणार आहे, त्यासाठी एका वेळी २० हजार विद्यार्थ्यांसाठी जेवण बनविण्याची क्षमता असलेले अद्ययावत स्वयंपाकगृह उभारण्यात येणार आहे. अशाच प्रकारे नाशिक जिल्ह्य़ातील मुंढेगाव येथील स्वयंपाकगृहातून नाशिक व इगतपुरी तालुक्यातील ४० किलोमीटर परिसरातील दहा आश्रमशाळा तसेच चार वसतिगृहांमधील जवळपास पाच हजार विद्यार्थ्यांना जेवण पुरविण्यात येणार आहे.