दिशा खातू, शलका सरफरे

ईशान्य भारत, राजस्थानातील शैलीची छाप; आदिवासी धाटणीचे दागिनेही लोकप्रिय

वर्षभर आधुनिक पेहरावासाठी आग्रही असणारी तरुणाई सण-उत्सव येताच पारंपरिक पेहरावाच्या मोहात पडलेली दिसते. यंदाही नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पारंपरिक धाटणीच्या दागिन्यांना मागणी वाढली आहे. प्राचीन काळातील दागिन्यांशी साधम्र्य असलेले, ईशान्य भारतातील आणि आदिवासी संस्कृतीची छाप असलेले दागिने खरेदी करण्याकडे तरुणींचा कल आहे.

नवरात्रोत्सवासाठी बाजारात विविध प्रकारचे दागिने आले आहेत. दक्षिण भारतातील ‘टेम्पल’ दागिन्यांचा प्रभाव आता काहीसा कमी झाला आहे. सध्या राजस्थान, ईशान्य भारतातील राज्ये आणि भूतान, नेपाळमधील दागिन्यांची छाप नवरात्रोत्सवातील दागिन्यांच्या बाजारावर दिसत आहे. हे दागिने आजही मोठय़ा प्रमाणात हाताने घडवले जातात. अनेक कारागीर दागिन्यांचे वेगवेगळे भाग त्या त्या ठिकाणाहून मागवतात आणि ते जोडून दागिने घडवतात, असे संगीता आर्ट ज्वेलरीच्या संगीता साठय़े यांनी सांगितले.

मुरुक्कन, योद्धा, कोकरु (राजस्थान) अशा आदिवासी पद्धतीच्या आणि जरदोसीच्या दागिन्यांना मोठी मागणी आहेत. यात कापड, लोकर, तारा, मणी, वेगवेगळे रंगीत दगड वापरले जातात, असे तिजोरी डॉट कॉम कंपनीच्या मानसी मल्होत्रा यांनी सांगितले. यात कापडावर नक्षीकाम करून ते दागिन्यांच्या साच्यात बसवले जातात. हे दागिने १५० ते २ हजार रुपयांपर्यंत उपलब्ध आहेत.

जर्मन चांदीमुळे दागिन्यांची किंमत कमी होते. हे दागिने ऑनलाइनही खरेदी केले जातात. यावर्षी अशा प्रकारच्या दागिन्यांची मागणी ४० टक्कय़ांनी वाढली आहे. तर ऑक्टोबरपासून या दागिन्यांची खरेदी ३०० ते ४०० नगांवर गेली आहे, असे ज्वेलरी डिझायनर प्रीती मोहन यांनी सांगितले. लाकडी विविध भौमितिक आकार असलेल्या बांगडय़ा, पाना-फुलांचे कानातले, मुला-मुलींचे किंवा नवरा-नवरीचे लाकडी हार, नाणे हार, दुहेरी पैंजण, लोकर हार आणि लोकर ब्रेसलेट बाजारात आले आहेत.

कानातले, हार, केसांसाठी लागणारे दागिने, कडे, कंबरपट्टा असे विविध दागिने बाजारात उपलब्ध आहेत. धातूच्या दागिन्यांबरोबरच रंगीबेरंगी दागिन्यांकडे तरुणींचा कल आहे. धातू आणि रंगीबेरंगी धाग्यांपासून बनविलेले आकर्षक नेकलेस, राजस्थानीकडे, झुमके यंदा बाजारात उपलब्ध आहेत. ठाण्यातील राममारुती रोड, गोखले रोड, जांभळी नाका परिसर तसेच विविध प्रदर्शनांमध्ये हे दागिने उपलब्ध आहेत. साधारण १००ते १००० रुपयांपर्यंत हे दागिने विक्रीसाठी ठेवण्यात आले आहेत.

चांदीच्या दागिन्यांना अधिक मागणी

नवरात्रीच्या पेहरावावर साजेसे दागिने बाजारात उपलब्ध आहेत. कारण पेहराव कोणताही असला तरी हे पारंपरिक दागिने असल्याशिवाय गरबा खेळल्यासारखे वाटत नाही. यंदा बाजारात चांदीच्या दागिन्यांचे असंख्य प्रकार पाहायला मिळत आहेत. त्यामध्ये चांदीची कर्णभूषणे, झुमके, कश्मिरी साखळी कर्णफुले, नेकलेस या आभूषणांना सर्वाधिक पसंती मिळत आहे.