वापरलेल्या दुचाकींच्या खरेदीकडे नागरिकांचा ओढा

मुंबई : टाळेबंदीतील शिथिलिकरणानंतर अनेक कार्यालये, दुकाने सुरु झाली असली तरी वाहनसुविधा मर्यादीत असल्याने गंतव्यस्थानी पोहचण्यासाठी आता अनेकांनी वापरलेल्या दुचाकी खरेदीस प्राधान्य द्यायला सुरुवात केली आहे. त्यामुळे या व्यवसायात सुमारे २५ टक्कय़ांची वाढ झाल्याचे व्यावसायिकांनी सांगितले.

जूनच्या दुसऱ्या आठवडय़ापासून मुंबई आणि महानगर परिसरात टाळेबंदीतील शिथिलिकरणाची प्रक्रीया सुरु झाली. मर्यादीत कर्मचारी संख्येसह अनेक कार्यालये उघडली. मात्र दूरवरच्या उपनगरातून शहरात पोहचण्यासाठी अद्यापही मोठी कसरत करावी लागत आहे. त्यामुळे अनेकांनी स्वत:ची दुचाकी खरेदी करून त्यावरून प्रवास करण्याचे प्रयत्न चालवले आहेत. त्यातही नवीन दुचाकींसाठी जादा दर मोजण्यापेक्षा वापरलेल्या दुचाकी खरेदी करण्यावर भर दिसत आहे. गेल्या दिड महिन्यात वापरलेल्या दुचाकींची चौकशी वाढल्याचे दहिसर येथील एम एम बाईक्सचे मलंग मुजावर यांनी सांगितले. यापूर्वी नवीन दुचाकी आणि वापरलेल्या दुचाकी विक्रीचे त्यांच्या शोरुममधील प्रमाण हे पन्नास-पन्नास टक्के होते. गेल्या दिड महिन्यात वापरलेल्या दुचाकींची मागणी आणि विक्री ६० ते ७५ टक्के इतकी झाली असल्याचे मुजावर यांनी नमूद केले. विशेषत: नोकरदार वर्गाला सध्याच्या एकंदरीतच अनिष्टिद्धr(१५५)ततेच्या काळात कमी खर्चात ही सुविधा अपेक्षित असल्याचे ते म्हणाले.

वापरलेल्या दुचाकींच्या मागणीचा भर हा पूर्णपणे स्कूटर वर्गातील वाहनांनाच असल्याचे जोगेश्वरी येथील हॉटव्हील प्लाझाचे इम्तियाज शेख यांनी सांगितले. पूर्ण कुटुंबाला वापरता येईल असे वाहन हा तर दृष्टीकोन आहेच. पण करोनाबरोबरच आलेल्या आर्थिक संकटामुळे ग्राहक मर्यादित पैसेच खर्च करण्यास प्राधान्य देत असल्याचे अनेक वितरकांनी सांगितले. सर्वसाधारणपणे १५ ते २० हजारात स्कूटर मिळावी अशी ग्राहकांची मागणी असल्याचे गोरेगाव येथील चाचु मोटर्सचे किरण शेट्टी यांनी सांगितले. अशी वाहने विकणारे वितरक हे जुनी वाहने खरेदी करतात आणि नंतर इच्छुक ग्राहकास विकतात. पण सध्या अशी वाहने विकायला येणाऱ्यांचे प्रमाणदेखील मर्यादीत असून, कधीकधी मागणीपेक्षा पुरवठा कमी अशी परिस्थिती दिसून येते, अशी माहिती शेट्टी यांनी दिली.

एकत्रित वाहन खरेदी

तुलनेने चारचाकी वाहनांसाठी अधिक खर्च असल्याने दोन-तीन जणांमध्ये मिळून मर्यादीत काळासाठी वाहन विकत घेण्याच्या घटना एकदोन ठिकाणी झाल्याची माहिती वितरकांनी दिली. मात्र हे प्रमाण सध्या तरी मर्यादीत आहे. दुसरीकडे ऑनलाईन माध्यमातूनदेखील असे व्यवहार मोठय़ा प्रमाणात होत असल्याचे ओएलएक्स इंडियाच्या ताज्या अहवालातून स्पष्ट होते. या अहवालानुसार चारचाकी वाहन घेण्यास प्राधान्य देणाऱ्यांची संख्या देशात ३० टक्कय़ांनी वाढली आहे. या ग्राहकांना तीन ते चार लाख रुपयातील वाहन अपेक्षित असते.

चारचाकींना फारशी मागणी नाही

वापरलेल्या चारचाकींची मागणी अगदीच मर्यादीत असल्याचे दिसते. दहिसर येथील सॅफरॉन कार्सचे समीर पटेल यांनी सांगितले की, गेल्या दिड महिन्यात वापरलेल्या चारचाकीसाठी शून्य मागणी आहे. अशा वाहनाची किंमत साधारणपणे ५० हजारापासून ते पाच लाखांपर्यंत असल्याची माहिती त्यांनी दिली.