महामार्गाच्या काँक्रिटीकरणाची कामे रखडल्याने वाहतूक कोंडीत भर

सार्वजनिक बांधकाम विभागाने पावसाळा संपताच सुरू केलेले शीव-पनवेल महामार्गाच्या दुरुस्तीचे काम कूर्मगतीने सुरू आहे. त्यामुळे वाहनचालकांना कोंडीचा सामना करावा लागत आहे. गतवर्षी पावसाळ्यात या मार्गावरील खड्डय़ांमुळे प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला होता. मात्र, यंदाही पावसाळय़ापूर्वी हे काम पूर्ण होणे कठीण असल्याचे दिसत आहे.

शीव-पनवेल महामार्गावर दरवर्षी पावसाळ्यात मोठय़ा प्रमाणात खड्डे पडतात. त्यामुळे पाच वर्षांपूर्वी सार्वजनिक बांधकाम विभागाने तब्बल १२०० कोटी रुपयांहून अधिक रक्कम खर्च करून या महामार्गाचे काँक्रिटीकरण केले. मात्र, उड्डाणपूल आणि काही ठिकाणचा रस्ता डांबरीच ठेवण्यात आला होता. गेल्या पावसाळ्यात शीव-पनवेल मार्गावर पुन्हा मोठय़ा प्रमाणात खड्डे पडले. त्यामुळे शीव ते पनवेल हे अवघ्या ४० ते ५० मिनिटांत  कापता येणारे अंतर पार करण्यास दीड ते दोन तास लागत होते. इंधनही वाया जात होते. मानखुर्द, वाशी टोल नाका,

वाशी गाव, वाशी उड्डाणपूल, तुर्भे उड्डाणपूल आणि तुर्भे पोलीस ठाण्याबाहेरील रस्ता तसेच खारघर उड्डाणपुलाजवळ मोठय़ा प्रमाणात खड्डे पडले होते.

कोंडीमुळे सार्वजनिक बांधकाम विभाग टीकेचे लक्ष्य ठरला होता. त्यामुळे रस्त्यावरील डांबरीकरणाच्या भागातही काँक्रिटीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यासाठी ७० कोटी रुपये निधी मंजूर करण्यात आला. पावसाळा संपल्यानंतर तत्काळ या कामाला सुरुवात करण्यात आली. मात्र सात महिने उलटल्यानंतरही अद्यापही मोठय़ा प्रमाणात काम शिल्लक आहे. पावसाळ्यापूर्वी हे काम पूर्ण करणार असल्याची माहिती त्या वेळी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून देण्यात आली होती.

मात्र, सर्वच उड्डाणपूल तसेच वाशीगाव, बेलापूर आणि खारघर परिसरातील रस्त्याचे काम संथगतीने सुरू आहे. परिणामी वाहनचालकांना सध्याही या महामार्गावरून जाताना मोठय़ा प्रमाणात वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे.

याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मुंबई मंडळाचे अधीक्षक अभियंता किशोर पाटील यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांची प्रतिक्रिया मिळू शकली नाही.

शीव-पनवेल महामार्गावर सुरू असलेल्या काँक्रिटीकरणाच्या कामांमुळे मुंबई तसेच नवी मुंबई शहरात वाहतूक कोंडी होत आहे. काँक्रिटीकरणाचे काम संथगतीने सुरू असल्याने पावसाळय़ापूर्वी ही कामे पूर्ण होणार का, असा सवाल केला जात आहे.