दररोज मुंबईकरांना विविध कारणांनी वाहतूककोंडीला सामोरे जावे लागते. मात्र शुक्रवारी सकाळी बोरीवलीत अजगर रस्त्यावर आल्यामुळे वाहनचालकांना वाहतूककोंडीला सामोरे जावे लागले. बोरिवलीच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यान परिसरातील रस्त्यावर अजगर आल्याने येथील रस्ता काही वेळ वाहतुकीसाठी बंद करावा लागला. परिणामी बोरिवली पूर्व परिसरात वाहतूककोंडी निर्माण झाली.

बोरिवलीच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाबाहेरील रस्त्यावर शुक्रवारी सकाळी सात वाजताच्या सुमारास एक पाच ते सात फुटांचा अजगर आला होता. उद्यानात सकाळी फेरफटका मारण्यास येणाऱ्या नागरिकांना अजगर दिसला आणि त्यांनी त्याची माहिती पोलिसांना दिली. उद्यानाच्या समोरच असलेल्या वाहतूक पोलिसांनी सुरक्षेच्या दृष्टिकोनातून काही वेळ तेथून गोरेगावच्या दिशेला जाणारी वाहतूक बंद केली. यामुळे प्रवाशांना वळसा घालून जावे लागले आणि येथे वाहतूककोंडी झाली.

अजगर सापडल्याची माहिती सर्पमित्रांना देण्यात आली. सर्पमित्र येईपर्यंत अजगर रस्त्याच्या कडेला असलेल्या जलवाहिनीमध्ये जाऊन बसला. अजगराला पाहण्यासाठी बघ्यांनीदेखील मोठी गर्दी केली होती. सर्पमित्रांनी मोठय़ा शिताफीने अजगरला बाहेर काढले आणि संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात सुखरूप ठिकाणी सोडले.