चार दिवसांच्या सलग सुटय़ांमुळे वाहनगर्दीत वाढ

शाळा-महाविद्यालयांची उन्हाळी सुटी आणि त्यातच सरकारी कार्यालयांना तब्बल चार दिवस जोडून आलेली सुटी यामुळे शनिवारी राज्यातील सर्वच प्रमुख महामार्गावरील वाहतूक कोलमडली. कोकणात जाणारी वाहने वडखळ, माणगाव येथे तर पश्चिम महाराष्ट्रात जाणारी वाहने द्रुतगती महामार्गावर खोळंबून पडली. दुसरीकडे कोकण आणि अन्यत्र जाणाऱ्या लांब पल्ल्यांच्या रेल्वे गाडय़ाही खच्चून भरलेल्या दिसल्या.

चौथा शनिवार, रविवार, बुद्धपोर्णिमा आणि महाराष्ट्र दिन व कामगार दिनानिमित्त २८ एप्रिल ते १ मेपर्यंत चार दिवस जोडून सुटी आल्याने मुंबई, ठाणे, नवी मुंबईतून शुक्रवारी रात्री, शनिवारी पहाटे मोठय़ा संख्येने वाहने कोकण, गोवा, कोल्हापूर, नाशिक, औरंगाबादसह अन्य पर्यटनस्थळे गाठण्यासाठी बाहेर पडली. महामार्ग पोलिसांनी या परिस्थितीचा अंदाज बांधून ताफ्यातला सर्व फौजफाटा रस्त्यांवर उतरवला. मात्र पोलिसांच्या अपेक्षेपेक्षा जास्त वाहने रस्त्यांवर आली.

महामार्ग पोलीस दलाचे अधीक्षक विजय पाटील यांनी ‘लोकसत्ता’ला दिलेल्या माहितीनुसार शनिवारी राज्याच्या सर्वच प्रमुख मार्गावर वाहतूक कोंडी दिसत होती. मुंबईहून पुण्याकडे जाणाऱ्या मार्गावर एक ते दोन ठिकाणी वाहतूक काही कालावधीसाठी ठप्प पडली. ही कोंडी फोडण्यासाठी दिवसातून पाच वेळा विरूद्ध दिशेने म्हणजेच मुंबईकडे येणाऱ्या मार्गिकेवरून वाहतूक सोडण्यात आली. मात्र वाहनांचा ओघ कमी होत नसल्याने या मार्गावरील  वाहतूक धीम्या गतीने पुढे सरकत होती. पुण्यापुढे साताऱ्याजवळ पुलाचे काम सुरू असल्याने येथे बराचकाळ वाहने खोळंबून पडली होती. तर कोकणात जाणारी वाहतूक वडखळ, माणगाव येथे खोळंबली होती.

शनिवारी मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग, पुणे-बंगळूरू महामार्ग सर्वाधिक गजबजले होते. पश्चिम महाराष्ट्रासह कोकणात जाणारी वाहनेही याच मार्गाचा वापर करतात. त्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाल्याचे निरीक्षण महामार्ग पोलिसांनी नोंदवले.

कोकण रेल्वे, बसगाडय़ा ‘फुल’

चार दिवस जोडून सुटी आल्याने शुक्रवारी रात्री, शनिवारी पहाटे कोकणात जाणाऱ्या रेल्वे गाडय़ा प्रवाशांनी गच्च भरून मार्गस्थ झाल्या. आरक्षण नसलेल्या, प्रतीक्षा यादीवर असलेल्या प्रवाशांनीही आरक्षित डब्यांमध्ये घुसखोरी करत गाडीत उभ्याने, मिळेल तेथे पथारी पसरून प्रवासास सुरूवात केली. एसटीनेही उन्हाळी सुटीसाठी जादा गाडय़ा सोडल्या.

एसटीच्या बहुतांश सर्वच लांब, मध्यम पल्ल्यांच्या बसगाडया १ मेपर्यंत आरक्षित आहेत. त्यामुळे प्रवाशांच्या मागणीनुसार एसटी प्रशासन आणखी जादा बसगाडय़ांची व्यवस्था करण्याच्या प्रयत्नात आहे.

चौपदरीकरण कामांनी कोंडीत भर..

अमृतांजन पुलाच्या चढणीवर काही अवजड वाहने बंद पडल्याने मुंबईकडून पुण्याकडे येणारी वाहतूक संथगतीने सुरू होती. वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी बोर घाटातील महामार्ग पोलिसांकडून प्रयत्न करण्यात येत होते, मात्र मोठय़ा संख्येने वाहने द्रुतगती मार्गावर आल्याने कोंडी सोडविणाऱ्या पोलिसांची दमछाक झाली. सध्या मुंबई-गोवा महामार्गाचे चौपदरीकरण सुरू आहे. दोन्ही बाजूने रस्ता खोदला आहे. त्यातच वाहनांची संख्या वाढल्याने महामार्गावर वाहतूक कोंडी झाली. वडखळ, इंदापूर, माणगाव येथे वाहतुकीचे नियमन करण्यासाठी पोलीस तनात करण्यात आले आहेत.