खड्डे आणि रेंगाळलेल्या दुरुस्ती कामांत तीन दिवस रखडलेल्या मालवाहू वाहनांची भर

मुंब्रा बाह्य़वळण रस्त्याचे लांबलेले काम, शीव-पनवेल मार्गाची खड्डय़ांमुळे झालेली चाळण आणि परळ टीटीचा बंद पडलेला पूल यामुळे ठाणे, नवी मुंबई आणि मुंबईत रस्तोरस्ती वाहतूक कोंडीचा ताप सर्वसामान्यांना सोसावा लागत आहे. ही कोंडी फोडण्यासाठी वाहतूक विभाग नेमके काय नियोजन करीत आहे, हे गुलदस्त्यात असताना सरकारच नव्हे, तर सर्वपक्षीय नेत्यांकडूनही महामुंबईकरांच्या हालांकडे दुर्लक्ष सुरू असल्याने संताप व्यक्त होत आहे.

मोठय़ा प्रमाणात साचलेल्या पाण्यामुळे अनेक मालवाहू वाहने मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईत प्रवेश करू शकत नव्हती. त्यामुळे नाशिक मार्गावरून येणारी वाहने भिवंडीकडे, दक्षिणेकडून गोवा, पुणे मार्गे येणारी खोपोली भागात, गुजरातकडून येणारी मालवाहने ही मनोर तसेच पालघरच्या पलीकडे थांबवून ठेवण्यात आली होती. बुधवारपासून मुंबई, ठाणे, नवी मुंबईच्या हद्दीत ही मालवाहू वाहने येण्यास सुरुवात झाली. परिणामी मोठय़ा संख्येने येणाऱ्या या वाहनांमुळे ठिकठिकाणी वाहतूक कोंडीत भर पडली. एक तासाच्या प्रवासासाठी दोन ते तीन तास लागत होते.

मुंब्रा बाह्य़वळण रस्त्याच्या लांबलेल्या कामामुळे ठाणे, नवी मुंबईतील वाहतुकीचे अक्षरश: तीनतेरा वाजले आहेत. त्यात बुधवारी  सायंकाळपासून या मार्गावरील वाहतुकीचे नियोजन पूर्णपणे ढासळले. ठाणे-बेलापूर मार्गासह ऐरोली, मुलुंड टोलनाके वाहन कोंडीत सापडले. ठाणे, मुलुंड, ऐरोली हा परिसर कोंडीग्रस्त झाला असताना खड्डयामुळे शीव-पनवेल मार्गावरील वाहतूकही कमालीची मंदावल्याने प्रवासी हैराण झाले आहेत. बाह्य़वळण रस्त्याच्या वाहतुकीचा भार कल्याण-शीळ-महापे रस्त्यावरही आला असून तेथे १५ मिनिटांचे अंतर कापण्यासाठी एक तास लागत आहे. ठाण्याकडील कोपरी पुलावर मोठे खड्डे पडल्याने वाहतूक पोलिसांनी ते बुजविण्याचे काम हाती घेतले. यामुळे दुपारपर्यत कोपरी पुलावर वाहन कोंडी झाली होती.

यात भर म्हणून मुंबई महापालिकेने जलवाहिनी दुरूस्ती हाती घेतल्याने गुरूवार दुपारपासून परळ टीटी येथील उड्डाणपूल वाहतुकीसाठी अचानक बंद केला गेला. दुरूस्तीचे काम शुक्रवारी पहाटेपर्यंत संपेल असा अंदाज असला तरी शुक्रवारीही हा पूल बंद ठेवावा लागण्याची शक्यता आहे. हा पूल बंद असल्याने दक्षिण मुंबईकडे जाणाऱ्या अन्य मार्गावर ताण पडला आणि तेथेही वाहतूक कोंडी झाली. संध्याकाळी दक्षिण मुंबईतून उपनगरांकडे परतणाऱ्या वाहतुकीलाही कोंडीचा फटका बसला.

वसई-विरार पाचव्या दिवशीही पाण्यात

वसई : पाऊस ओसरूनही सलग पाचव्या दिवशी वसई शहर पाण्याखाली होते. पाणी उपसण्यासाठी कोणतीच शासकीय उपाययोजना नसल्याने नालासोपाऱ्यापासून वसई आणि विरार शहरांमधील जनजीवन पूर्णपणे कोलमडलेले आहे. अनेक भागांत वीज नाही.  काही भागांत चार फुटांहून अधिक पाणी आहे. सर्वच शहरातील नागरिकांचे अन्न आणि शुद्ध पाण्यासाठी हाल सुरू आहेत. या भीषण परिस्थितीला सावरण्यासाठी कोणताही लोकप्रतिनिधी फिरकत नसल्याची तक्रार नागरिकांकडून होत आहे.

कोंडीची ठिकाणे

  • रबाळे नाका
  • मुकंद कंपनी
  • भारत बिजली
  • महापे सर्कल
  • सविता केमिकल्स
  • तुर्भे जंक्शन
  • ऐरोली-मुलुंड टोलनाका